इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग- पुण्याची विजयाची हॅटट्रिक

पुणे । अमरजित सिंगच्या आक्रमक चढाया व त्याला अब्दुल शेखची मिळालेली मोलाची साथ या जोरावर इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत पुणे प्राईड संघाने पाँडिचेरी प्रिडेटर्सवर 47-36 असा विजय मिळवला. या स्पर्धेतील पुण्याचा सलग तिसरा विजय आहे. अमरजित सिंगने तब्बल 22 गुणांची कमाई करत सामना पुण्याच्या बाजूने झुकवला.

पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या सामन्यात पाँडिचेरी प्रिडेटर्स संघाने यजमान पुणे प्राईड संघाविरुद्ध पहिल्या क्वॉर्टरमध्ये 12-9 अशी आघाडी घेत सुरुवात केली.पाँडिचेरी संघाकडून आर. सुरेश कुमार व करमबीर ठाकूर यांनी चढाईत गुणांची कमाई केली.पुण्याकडून अब्दुल शेखने चढाई व बचाव दोन्ही आघाड्यांवर छाप पाडली.दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये पुण्याच्या संघाने आणखीन आक्रमक खेळ केला.यजमानांकडून अमरजित सिंगनेअष्टपैलू कामगिरी करत संघाला आघाडी मिळवून देण्यात योगदान दिले व त्यामुळे पुण्याने दुसरे क्वॉर्टर 15-7 असे आपल्या नावे करत मध्यंतरापर्यंत 24-19 अशी आघाडी घेण्यात यश मिळवले.अब्दुल शेख व अमरजित यांनी संघासाठी अर्ध्याहून अधिक गुणांची कमाई केली.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघामध्ये अपेक्षेनुसार चुरस पहायला मिळाली.पण, पुण्याच्या खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत क्वॉर्टरमध्ये 8-5 अशी बाजी मारली. यावेळी दोन्ही संघामध्ये आठ गुणांचा फरक होता.शेवटच्या क्वॉर्टरमध्ये प्रतिस्पर्धी संघाकडून गुण मिळवण्याचे प्रयत्न झाले काही अंशी त्यांना यश देखील मिळाले पण, पुण्याच्या संघाने देखील गुण मिळवण्याची कोणतीच संधी सोडली नाही व शेवटचा क्वॉर्टर 15-12 असा आपल्या नावे करत विजयावर शिक्कामोर्तब केले.अमरजित सिंग याने आपल्या चढाईत 20 हुन अधिक गुणांची कमाई करत निर्णायक भूमिका पार पाडली.

शनिवारचे सामने :
दिलेर दिल्ली वि.तेलुगु बुल्स (सामना अकरावा) ( 8 -9 वाजता)
चेन्नई चॅलेंजर्स वि. मुंबई चे राजे (सामना बारावा) (9-10 वाजता)