पश्चिम रेल्वे, ठाणे महानगरपालिका, एयर इंडीया, देना बँक संघाचा स्वराज्य प्रतिष्ठान कबड्डी स्पर्धाच्या उपांत्य फेरीत प्रवेश

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्वराज्य प्रतिष्ठान विक्रोळी या संस्थेच्या वतीने दि. १० ते १४ जानेवारी २०१९ या कालावधीत कै. रवींद्र म्हात्रे क्रीडांगण, विकास कॉलेज समोर,कन्नमवार नगर-२ विक्रोळी पूर्व मुंबई ८३ येथे आमदार सुनील राऊत चषक व्यवसायिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

काल (दिनांक १३ जानेवारी) रोजी यास्पर्धेत बादफेरीचे सामने पार पडले. महिला विभागात पश्चिम रेल्वे विरुद्ध अनुष्का ट्रॅव्हल यांच्यात झालेल्या पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पश्चिम रेल्वेने ५४-०९ असा सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. सोनाली शिंगटे व मीनल जाधव यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या उपउपांत्यपूर्व सामन्यात विजयश्री प्रोसेस विरुद्ध डब्लू टी ई इन्फा यांच्यात झाला. डब्लू टी ई इन्फा संघाने ५१-१९ अशी बाजी मारली.

पुरुष विभागात एयर इंडिया विरुद्ध मुंबई बंदर यांच्यात उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. एयर इंडिया ने ३६-२१ असा विजय मिळवला. एयर इंडिया कडून असलम इनामदार, आदिनाथ गवळी व शुभम शिंदे यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या उपउपांत्यपूर्व सामना अंत्यत चुरशीचा झाला. युनियन बँक विरुद्ध महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यात झालेला सामना शेवटच्या मिनिटाला युनियन बँकेने २७-२५ असा खिशात घातला. अजिंक्य पवार ने चांगला खेळ करत चढाईत गुण मिळवले. तर सचिन पाटील ने चांगल्या पकडी केल्या.

महिलां विभागात झालेल्या तिसऱ्या उपउपांत्यपूर्व सामन्यात ठाणे महानगरपालिका संघाने ४२-२२ असा मुंबई महानगरपालिका संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ठाणे महानगरपालिका संघाची ही पहिलीच स्पर्धा असून संघाने सांघिक कामगिरी करत स्पर्धेत विजयी वाटचाली सुरू ठेवली आहे. तर शेवटच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात देना बँक संघाने साई सिक्युरिटी पुणेच्या ४२-२१ असा पराभव केला.

पुरुष विभागात झालेल्या तिसऱ्या उपउपांत्यपूर्व सामना अटीतटीचा झाला. मध्यंतरा पर्यत १७-१६ अशी शुल्लक आघाडी देना बँक कडे होती. त्यानंतर सेंट्रल बँक संघाने खेळ उंचावत सामन्यात आघाडी मिळवली होती. पण पुन्हा एकदा देना बँक कडून नितीन देशमुखने सुपर रेड करत देना बँक ला आघाडी मिळवून दिली. हा सामना देना बँकने ४०-३४ असा जिंकला. भारत पेट्रोलियम संघाने बँक ऑफ इंडिया संघाचं सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

स्वराज प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा

महिला विभाग उपांत्य फेरीचे सामने (१४ जानेवारी २०१९)

१) पश्चिम रेल्वे (मुंबई) विरुद्ध ठाणे महानगरपालिका (ठाणे)

२) देना बँक (मुंबई) विरुद्ध डब्लू टी. ई. इन्फा (उपनगर)

पुरुष विभाग उपांत्य फेरीचे सामने (१४ जानेवारी २०१९)

१) एयर इंडिया (मुंबई) विरुद्ध युनियन बँक (मुंबई)

२) भारत पेट्रोलियम (मुंबई) विरुद्ध देना बँक (मुंबई)