ISL: पुणे घरच्या मैदानावरही एटीकेविरुद्ध जिंकणार का ?

पुणे: हिरो इंडियन सुपर लीगचा (आयएसएल) महत्त्वाचा टप्पा आता सुरू झाला असून पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीमधील चुरस वाढली आहे. यादृष्टीने एफसी पुणे सिटी आणि एटीके यांच्यात शनिवारी होणारी लढत महत्त्वाची आहे. पुण्याने गतविजेत्या एटीकेला कोलकत्यात हरविले होते. आता पुणे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील घरच्या मैदानावर सुद्धा हा पराक्रम करणार का याची उत्सुकता आहे.

 

बेंगळुरु एफसी, चेन्नईयीन एफसी आणि काही प्रमाणात एफसी गोवा या संघांसाठी पहिला टप्पा आनंददायक ठरला. आघाडीवरील संघांमध्ये त्यांनी स्थान मिळविले आहे. पुणे सिटीने सुद्धा बहुतांश चांगली कामगिरी केली, पण बाद फेरीचे दावेदार म्हणून त्यांना आपले स्थान अद्याप भक्कम करता आलेले नाही.

 

पुणे सिटीने 10 सामन्यांतून 16 गुण मिळविले असून त्यांचा तिसरा क्रमांक आहे, पण इतर संघ सुद्धा आगेकूच करून आपल्याला हटविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची त्यांना जाणीव आहे. याच संघांमध्ये एटीकेचा समावेश आहे. त्यामुळे ही लढत उत्कंठावर्धक ठरेल.

 

बाद फेरीत केवळ चारच संघ जाणार याची दोन्ही संघांना कल्पना आहे. त्यामुळे इतर संघांना मागे टाकणे त्यांना अनिवार्य असेल. पुणे सिटीला मागील सामन्यात चेन्नईयीनविरुद्ध एकमेव गोलने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे पुणे सिटीचा निर्धार वाढलेला आहे.

 

पुणे सिटीला आतापर्यंत 11 गोल पत्करावे लागले असून यातील दहा दुसऱ्या सत्रात झाले आहेत. याविषयी सहाय्यक प्रशिक्षक व्लादिचा ग्रुजीच म्हणाले की, आम्ही पहिल्या सत्राइतका चांगला खेळ नंतर करू शकलो नाही. आम्हाला संधी मिळाल्या पण त्या वाया गेल्या. दुसऱ्या सत्रात गोल होऊ नयेत म्हणून आम्हाला प्रयत्न करावे लागतील.

 

चेन्नईयीनविरुद्ध पुण्याला स्टार स्ट्रायकर मार्सेलिनीयो याची उणीव जाणवली. निलंबनामुळे ब्राझीलचा हा खेळाडू खेळू शकला नाही. आता तो पुनरागमन करेल. पहिल्या टप्यात त्यानेच दोन गोल केले होते आणि पुणे सिटीने 4-1 असा दणदणीत विजय मिळविला होता. या पराभवामुळे एटीके संघ दुखावला गेला असेल.

 

त्यानंतर मात्र एटीकेने कामगिरी उंचावली आहे. टेडी शेरींगहॅम यांच्या संघाला सुरवातीला झगडावे लागले. पहिल्या विजयासाठी त्यांना पाचव्या लढतीपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. संथ सुरवातीमुळे त्यांच्या वाटचालीवर परिणाम झाला असला तरी आता त्यांना आगेकूच करण्याची संधी आहे.

 

शेरींगहॅम यांनी सांगितले की, आम्ही आधीच्या निकालाची भरपाई करण्यासाठीच येथे आलो आहोत. आम्हाला 1-4 असा पराभव पत्करावा लागला आणि आम्हाला या निकालात बदल करायचा आहे.

 

एटीकेचे गोलचे रेकॉर्ड कमी आहे आणि या लढतीत ते बदलण्याचा शेरींगहॅम यांचा प्रयत्न राहील. ते म्हणाले की, आम्हाला हवे तेवढे गोल करता आलेले नाहीत, पण याचा अर्थ आमच्या स्ट्रायकरकडे क्षमता नाही असे नाही. गोल करणे अवघड आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आमच्या आघाडी फळीत क्षमता आहे. या लढतीत ती उंचावण्यासाठी आम्ही प्रत्येक पातळीवर प्रयत्न करू.

 

एटीकेला यापूर्वीचा विजय नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध मिळाला. त्यानंतर विंगर डेव्हिड कॉटेरील, स्ट्रायकर मार्टिन पॅटरसन आणि गोलरक्षक सोराम पोईरेई यांना पाचारण करून त्यांनी संघ भक्कम केला आहे. स्टार स्ट्रायकर रॉबी किन हा सुद्धा तंदुरुस्त होत आहे. त्यामुळे पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी शेरींगहॅम यांच्याकडे परिपूर्ण पर्याय असतील.