विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…

18 आॅगस्ट 2008 मध्ये भारतीय संघात विराट कोहली नावाच्या 19 वर्षांच्या एका युवा खेळाडूचे पदापर्ण झाले होते. आज हा खेळाडू त्याच्या पदार्पणाचे 10 वर्ष पूर्ण करत आहे.

या दहा वर्षात त्याने अनेक यशाची शिखरे पार केली आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सुरु झालेला त्याचा हा प्रवास इतक्या वेगाने झाला की आज तो भारतीय संघातील सर्वात मौल्यवान आणि सर्वच संघ ज्याचा हेवा करतात असा फलंदाज आणि कर्णधार आहे.

कर्णधार म्हणून त्याला अजून बरचं काही सिद्ध करायच आहे पण एक फलंदाज खरतरं सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.

पदार्पणानंतर पहिल्या दोन वर्षात जेमतेम दोनच शतके करणाऱ्या विराटने 2011 नंतर मात्र शतकांची बरसात केली. त्याने 2011 नंतर तब्बल 53 शतके केली.

2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. पण तो पर्यंत या खेळाडूने त्याची मोठी ओळख निर्माण केली नव्हती. पण 2011 च्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात त्याने बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी केली आणि त्याच्यातील क्षमतेची चुनूक दाखवली.

त्या सामन्यात सेहवागने 175 धावा केल्या पण विराटने केलेल्या शतकानेही सर्वांचे लक्ष वेधले होते. इथेच त्याने आपली एक नवी ओळख पटवून दिली आणि रनमशीन म्हणून नवीन ओळख मिळवण्याकडे हा प्रवास सुरु झाला.

सुरुवातीला आक्रमक म्हणण्यापेक्षा रागीट स्वभावामुळे अनेकांच्या तो लक्षात राहीला पण पुढे अशा स्वभावापेक्षाही खेळ महत्त्वाचा हे लक्षात आल्याने त्याने खेळाकडे त्याचे लक्ष हलवले.

त्याच्याही कारकिर्दीत अनेक चढउतार आले पण आज त्याच्या इतका जिद्दी आणि चिकाटी असलेला खेळाडू क्वचितच पहायला मिळेल. त्याने त्याच्या फिटनेससाठी घेतलेले कष्ट, त्यासाठी अनेक आवडत्या गोष्टींचा केलेला त्याग या सगळ्याच गोष्टीतून त्याचे खेळासाठी (सर्वोत्तम खेळासाठी म्हणणेच उत्तम) प्रेम दिसून येते.

एखादी गोष्ट आवडत असेल तर त्यासाठी कशी जिद्द आणि चिकाटी असायली हवी याचे सध्याच्या घडीला सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे हा विराट कोहली.

या 10 वर्षात भारतीय संघात अनेक बदल झाले. विराटच्या पदार्पणावेळी भारतीय संघात असलेल्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हिव्हिएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग असे अनेक दिग्गज खेळाडूंनी एकएक करत निवृत्ती स्विकारली. भारतीय संघ यात मोठ्या बदलातून जात असतानाच या विराटने फलंदाजीची जबाबदारी स्विकारत भारताला कधीही मागे पडू दिले नाही की कधी फलंदाजीची पोकळी जाणवू दिली नाही.

त्याच्या याच स्वभावामुळे त्याला भारताच्या नेतृत्वाचीही जबाबदारी मिळाली जी तो सध्या उत्तम प्रकारे निभावताना दिसत आहे. पण त्याला एक सर्वोत्तम कर्णधार होण्यासाठी वेळ लागेल. ज्यावेळी तो परदेशात भारतचे नेतृत्व करताना विजय मिळवेल तेव्हा तो एक सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणूनही सर्वांच्या समोर येईल. ज्याप्रमाणे त्याला फलंदाज म्हणून आजपर्यंत यश मिळाले आशा आहे की त्याला एक संघनायक म्हणूनही असेच भरभरुन यश मिळेल.

10 वर्षातील विराटचा प्रवासातील काही महत्त्वाचे टप्पे-

-18 आॅगस्ट 2008 – श्रीलंकेविरुद्ध डांबुला येथे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण. हे त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही ठरले.

-12 जून 2010 – झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे टी20 पदार्पण.

-20 – 23 जून 2011 – विंडिजविरुद्ध किंग्सटॉवन येथे कसोटी पदार्पण.

-24 डिसेंबर 2009 – पहिले आंतरराष्ट्रीय शतक (श्रीलंका विरुद्ध, कोलकतामधील इडन गार्डन स्टेडीयम)

-19 एप्रिल 2011 – पहिले विश्वचषकातील शतक

-6 जानेवारी 2015 – भारतीय कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिला सामना (आस्ट्रेलिया विरुद्ध, सिडनी)

-15 जानेवारी 2017 – भारतीय संघाचा सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी पूर्णवेळ कर्णधार

-16 नोव्हेंबर 2017 – आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 50 शतके पूर्ण (श्रीलंकाविरुद्ध कसोटी सामना, कोलकतामधील इडन गार्डन स्टेडीयम)

-18 आॅगस्ट 2018 – कारकिर्दीला दहा वर्षे पूर्ण

आंतरराष्ट्रीय कारकिर्द-

-कसोटी: 68 सामने – 5794 धावा, 22 शतके, 17 अर्धशतके सरासरी – 53.31

-वनडे: 211 सामने – 9779 धावा, 35 शतके, 48 अर्धशतके, सरासरी – 58.20

-टी20: 62 सामने – 2102 धावा, 18 अर्धशतके, सरासरी – 48.88

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

रिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील

कसोटी पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतबद्दल माहित नसलेल्या काही खास गोष्टी

तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल