उमेश यादवचे वनडेत १०० बळी

बेंगलोर । आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा वनडे सामना सुरु आहे. पहिल्या तीन सामन्यात संधी न मिळालेल्या उमेश यादवला चौथ्या सामन्यात संधी मिळाली. या संधीचे सोने करताना त्याने वनडेत शंभर बळींचा टप्पा पार केला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ भारताच्या वेगवान गोलंदाज उमेश यादवचा १०० वा बळी ठरला. उमेशने त्याच्या ७१व्या वनडे सामन्यात हा टप्पा गाठला. हा टप्पा पार करणारा तो भारताचा अठरावा गोलंदाज ठरला. सध्या उमेशच्या नावावर ७१ वनडे सामन्यात ३२.२५च्या सरासरीने १०२ विकेट्स आहेत.

वनडेत जलद १०० बळींचा टप्पा पार करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या नावावर आहे. त्याने ५२ सामन्यात हा विक्रम केला आहे. भारताचा इरफान पठाण या यादीत सातव्या क्रमांकावर असून त्याने ५९ सामन्यात पाकिस्तान विरुद्ध वनडेतील १०० बळी पूर्ण केले होते.