११५ व्या आगाखान हॉकी स्पर्धेचे ओडिसा संघाने पटकावले विजेतेपद

पुणे । सेल ओडिसा संघाने आर्मी बॉइज बिहार संघावर मात करून महाराष्ट्र हॉकी असोसिएसनच्या वतीने आयोजित ११५व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेतील पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले.

नेहरूनगर येथील पिंपरी-चिंचवडच्या मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी मैदानावर ही स्पर्धा झाली.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष इक्रम खान, आयडीएफसी बॅंकेच्या मिली महाडीक, स्पर्धेचे संचालक शरद रोच, योगेश मुथेय्या, महेश रसाळ, जगदीश कस्तुरे, हाकी खेळाडू नईम खान, भोपाळचे शाबाद खान, सागर पवार, अनिकेत मोरे,आहद खान,देवदास मार्टीन, वसंत मोरे यांच्या उपस्थितीत झाले.

या स्पर्धेच्या अंतिम लढतीत ओडिसा संघाने बिहार संघावर २-१ने मात केली आणि विजेतेपद मिळवले. दोन्ही संघांकडून वेगवान खेळ झाला. लढतीच्या नवव्याच मिनिटाला साजन याने अप्रतिम गोल करून बिहार संघाला आघाडी मिळवून दिली.

दुस-या सत्रात ओडिसा संघाने बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. मध्यंतराला बिहार संघाने १-० अशी आघाडी कायम राखली होती. यानंतर तिस-या सत्राच्या सुरुवातीलाच विकास लाक्राने (३१ मि.) बिहारच्या गोलकीपरला चकवून सुरेख गोल नोंदविला आणि ओडिसाला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

याच्या चार मिनिटानंतर जय प्रकाशने (३५ मि.) गोल करून ओडिसा संघाला २-१ने आघाडी मिळवून दिली. तिस-या सत्राअखेर ओडिसा संघाने ही आघाडी कायम राखली होती. चौथ्या सत्रात दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाला. मात्र, दोन्ही संघांना एकमेकांची बचाव फळी भेदता आली नाही. अखेर ओडिसा संघाने २-१ अशी आघाडी कायम राखून बाजी मारली.

महिला गटात भोपाळला विजेतेपद
महिला गटाच्या अंतिम फेरीत भोपाळ संघाने नागपूरवर २-०ने मात केली आणि विजेतेपद मिळवले. लढतीच्या ३२व्या मिनिटाला आरतीने गोल करून भोपाळला आघाडी मिळवून दिली. यानंतर सोनी लढवालने ४१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भोपाळची आघाडी २-०ने वाढवली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून भोपाळने विजेतेपद मिळवले.

महत्त्वाच्या बातम्या:

जे कोणत्याही आशियाई कर्णधाराला जमले नाही ते विराट कोहलीने करुन दाखवले!

अॅडलेड कसोटी जिंकत विराट कोहलीच्या टीम इंडियाने घडवला इतिहास

अॅडलेड कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंत चमकला, केले हे खास विक्रम