११५ वी आगाखान हॉकी स्पर्धा : ओडिसा, बिहार, लखनौ उपांत्य फेरीत दाखल

पुणे | महाराष्ट्र हॉकी संघटना आयोजित ११५व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेत सेल ओडिसा, लखनौ, आर्मी बॉइज बिहार  या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ओडिसा आणि मध्य प्रदेश, तसेच बिहार आणि लखनौ यांच्यात उपांत्य लढत रंगणार आहे.
नेहरूनगर येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ओडिसा संघाने राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) संघावर ३-१ने मात केली. यात लढतीच्या नवव्या मिनिटाला दीपक मलयीच्या पासवर राहुल मयकरने गोल करून एसआरपीएफला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, यानंतर ओडिसाच्या खेळाडूंनी आक्रमक चाली रचून एसआरपीएफ संघावर वर्चस्व राखले. यानंतर १८व्या मिनिटाला ए. टिक्काच्या पासवर कारीद डुलनाने गोल करून ओडिसाला बरोबरी साधून दिली. यानंतर एम. किकात्ता (२९ मि.) आणि एस. एक्का (४९ मि.) यांनी गोल करून ओडिसाला ३-१ असा विजय मिळवून दिला. दुस-या लढतीत एस. जॉन्सनच्या हॅटट्रिकच्या जोरावर आर्मी बॉइज बिहार संघाने एओई सिकंदराबाद संघावर ४-२ने मात केली. जॉन्सन संघाने
तिस-या, सातव्या आणि ३१व्या मिनिटाला गोल केले, तर चौथा गोल साजनसिंगने (३६ मि.) केला. सिकंदराबाद संघाकडून दोन्ही गोल समीर शेखने (२१, ४८ मि.) केले.
 
पुणे संघाचा पराभव
पुणे पोलिस संघाला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. गतविजेत्या लखनौ संघाने पुणे पोलिस संघावर ५-१ने मात केली. यात रफिक शेखने (२१, ५१ मि.) दोन, तर नीरजकुमार (१० मि.), दीपू साही (२६ मि.), तालीब शेख (३१ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पुणे पोलिस संघाकडून एकमेव गोल जगदीश कस्तुरेच्या पासवर आयुष पेडारीने (४१ मि.) केला.
निकाल – पुरुष गट – उपांत्यपूर्व फेरी – १) सेल ओडिसा – ३ (कारीद डुलना १८ मि., एम. किकात्ता २९ मि., एस. एक्का ४९ मि.) वि. वि. राज्य राखीव पोलिस दल – १ (राहुल मयकर  ९ मि.) २) आर्मी बॉइज बिहार – ४ (एस. जॉन्सन ३, ७, ३१ मि., साजनसिंग ३६ मि.) वि. वि. एओई सिकंदराबाद – २ (समीर शेख २१, ४८ मि.). ३) लखनौ – ५ (रफिक शेख २१, ५१ मि., नीरजकुमार १० मि., दीपू साही २६ मि., तालीब शेख ३१ मि.) वि. वि. पुणे पोलिस संघ – १ (आयुष पेडारी ४१ मि.)
अशा रंगतील उपांत्य लढती – सेल ओडिसा वि. मध्य प्रदेश  – दुपारी २ पासून
आर्मी बॉइज बिहार वि. लखनौ – दुपारी ३.३० पासून