आयपीएलच्या सामन्यांच्या वेळेत बदल; ७ एप्रिल पासून रंगणार आयपीएलचा थरार

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आज आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा कालावधी आणि सामन्यांच्या वेळा घोषित केल्या आहेत. यावर्षीच्या आयपीएलचा थरार ७ एप्रिल ते २७ मे या कालावधीत रंगणार आहे.

सलामीचा आणि अंतिम सामना मुंबईतच होईल, तर ६ एप्रिलला ११ व्या मोसमाच्या आयपीएलचा उदघाटन सोहळा मुंबईतच पार पडेल.

याबरोबरच आयपीएलचे प्रसारक असणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने सामन्यांच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती ती देखील आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मान्य केली आहे. या बदललेल्या वेळेनुसार आता ४ वाजताचे सामने ५.३० वाजता तर ८ वाजताचे सामने ७ वाजता खेळवले जातील.

याबद्दल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, “प्रसारकांनी सामन्यांच्या वेळेत बदल करण्याची विनंती केली होती. ती गव्हर्निंग कौन्सिलने मान्य केली आहे. जर सामना ८ वाजता सुरु झाला तर तो रात्री उशिरा संपतो.” या कारणामुळेच सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आलेले आहेत.

पुढे शुक्ला म्हणाले, “आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (शनिवार आणि रविवार) दोन सामने घेतले जातील. ४ वाजताचे सामने ५.३० वाजता खेळवले जातील. यामुळे सामने ओव्हरलॅप होत आहेत, पण प्रसारकांनी सांगितले की त्यांच्याकडे एकाचवेळी हे सामने दाखवण्यासाठी वेगवेगळे चॅनेल्स आहेत.”

राजस्थान रॉयल्स संघाच्या घराच्या सामन्यांचा निर्णय २४ जानेवारीला राजस्थान उच्च न्यायालयाच्या सुनावणी नंतर घेतला जाईल. राजस्थान रॉयल्स संघ २ वर्षांच्या बंदी नंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे.

याबद्दल राजीव शुक्ला म्हणाले, “हे प्रकरण न्यायालयात आहे. माझ्या मते २४ जानेवारीला, याबद्दल न्यायलय सुनावणी करेल. आम्ही त्याचीच वाट पाहत आहे. जर स्टेडियम तयार असेल आणि न्यायालयानेही राजस्थान क्रिकेट संघटनेला मंजुरी दिली तर पहिली पसंती जयपूरलाच असेल. पण जर असे नाही झाले तर दुसरा पर्याय म्हणून पुण्याला पसंती असेल.”

या बैठकीत किंग्स इलेव्हन पंजाबचे घरच्या ७ सामन्यांपैकी ४ सामने मोहालीत तर ३ सामने इंदोर मध्ये होतील असेही ठरले आहे.

माजी कर्णधार सौरव गांगुली आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचा सदस्य आहे. पण तो आज झालेल्या बैठकीत गैरहजर होता.

आयपीएलच्या मुख्य लिलावासाठी दोन दिवसांपूर्वीच खेळाडूंची त्यांच्या बेस प्राईससह यादी जाहीर झाली आहे. या यादीत २४४ कॅप खेळाडू, ३३२ अनकॅप खेळाडू आणि २ सहयोगी देशांचे खेळाडू असे एकूण ५७८ खेळाडूंचा समावेश आहे. हा लिलाव बंगळुरूमध्ये २७ आणि २८ जानेवारीला होणार आहे.