हा १६ वर्षीय क्रिकेटपटू खेळणार २०१८च्या आयपीएलमध्ये

आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे लिलाव गेले दोन दिवस बंगळुरूमध्ये सुरु होते. या लिलावात सर्वच फ्रॅन्चायझींनी अनुभवी खेळाडूंपेक्षा तरुण आणि प्रतिभाशाली खेळाडूंना पसंती दर्शवली. त्यामुळे अनेक मोठ्या खेळाडूंवर या लिलावात बोली लागली नाही.

या लिलावादरम्यान सर्वात जास्त चर्चा झाली ती अफगाणिस्तानच्या मुजीब जरदान या १६ वर्षीय खेळाडूची. मुजीबला आयपीएल लिलावात तब्बल ४ कोटींची किंमत मिळाली. त्याला संघात घेण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या दोन फ्रॅन्चायझींमध्ये चांगली चुरस बघायला मिळाली. पण अखेर किंग्स इलेव्हन पंजाबने बाजी मारली आणि मुजीबचा पंजाब संघात समावेश झाला.

सध्या मुजीब न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात व्यस्त आहे. तसेच त्याने अफगाणिस्तानच्या वरिष्ठ संघाकडून ३ वनडे सामने देखील खेळले आहेत. त्याने त्याच्या आंतराष्ट्रीय पदार्पणातच आयर्लंड विरुद्ध २४ धावात ४ बळी घेऊन अफगाणिस्तानच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली होती.

बांगलादेश विरुद्ध १९ वर्षांखालील द्विपक्षीय वनडे मालिकेत मुजीबने एकूण १७ बळी घेतले होते. तसेच या मालिकेतील एका सामन्यात त्याने १९ धावा देत ७ बळी घेतले होते. तसेच अफगाणिस्तानने प्रथमच जिंकलेल्या १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये मुजीबने महत्वाचा वाटा उचलला होता. त्याने या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध १३ धावात ५ बळी घेण्याचीही कामगिरी केली होती.

तसेच त्याने सध्या सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात यजमान न्यूझीलंड विरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात १४ धावांमध्ये ४ बळी घेऊन अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला होता.

आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात मुजीब झर्दन हा आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा २१व्या शतकात जन्म झालेला पहिला खेळाडू ठरला होता.

मुजीब बरोबरच रशीद खान, झहीर खान आणि नबी या खेळाडूंनाही चांगली बोली लागली.