आयपीएल २०१८: का आहे आजच्या सामन्यात १६० आकड्याला महत्व

आयपीएल २०१८ च्या थराराला आजपासून सुरुवात होणार आहे. आज मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सलामीचा सामना रंगणार आहे.

या दोन्ही संघाच्या कर्णधारांसाठी हा सामना खास आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एम एस धोनी या दोघांचाही आजचा सामना आयपीएलमधील १६० वा सामना आहे.

तसेच हे दोघंही आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विभागून दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर या यादीत चेन्नई संघाचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना अव्वल स्थानी आहे. तो आयपीएलमध्ये १६० सामान्यांचा टप्पा गाठणारा एकमेव खेळाडू आहे.

रोहित आणि धोनी यांची आत्तापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये ३२.६१ च्या सरासरीने ४२०७ धावा केल्या आहेत. यात त्याने १ शतक आणि ३२ अर्धशतके केली आहेत.

तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. याचबरोबर रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने ३ वेळा आयपीएलचे विजेतेपदाची मिळवले आहे.

त्याचबरोबर धोनीचीही आतापर्यंतची कामगिरी चांगली झाली आहे. तो यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने ३७.८८ च्या सरासरीने ३५६१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १७ अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने २०१० आणि २०११ असे दोन वर्ष सलग विजेतेपद मिळवले आहे. तसेच तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाराही कर्णधार ठरला आहे.

आज रोहितचा मुंबई संघ आणि धोनीचा चेन्नई संघ आमने सामने येणार आहेत. त्यामुळे या दोन कर्णधारांच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.