डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षा सरासरी जास्त, वय केवळ १८ वर्ष

अफगाणिस्तानच्या बहीर शाह या खेळाडूने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये असा काही कारनामा करून दाखवला आहे की जो दिग्गज खेळाडूंनाही करता आला नाही. फर्स्ट क्लास अर्थात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कमीतकमी १ हजार धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याची सरासरी आहे १२१.७७ची.

महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आजपर्यंत हा विक्रम होता परंतु शाहने तो आता आपल्या नावावर केला आहे.

आयसीसीने दिलेल्या एका वृत्तात असे म्हटले आहे, ” जगात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी कुणाची असे विचारले तर सर्वजण डॉन ब्रॅडमन यांच नाव घेतील परंतु अफगाणिस्तानच्या बहीर शाह ह्या खेळाडूने हा विक्रम आता आपल्या नावावर केला आहे. त्याची सरासरी आहे १२१.७७”

ब्रॅडमन यांनी २३४ प्रथम श्रेणी सामन्यात ९५.१४च्या सरासरीने २८,०६७ धावा केल्या होत्या तर बहीर शाहने ७ सामन्यात १२१.७७च्या सरासरीने १०९६ धावा केल्या आहेत.

सध्या हा खेळाडू अफगाणिस्तानमध्ये अंडर १९च्या विश्वचषकात खेळण्यासाठी न्यूझीलँडमध्ये सराव करत आहे. त्याने येथे झालेल्या सराव सामन्यातही चांगली कामगिरी केली आहे.

यापूर्वीही या खेळाडूने अनेक पराक्रम केले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात त्रिशतकी खेळी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला होता. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचे माजी दिग्गज फलंदाज जावेद मियाँदाद यांच्या नावावर होता. त्यांनी १७व्या वर्षी त्रिशतकी खेळी केली होती.

तसेच त्याच्या पहिल्याच फर्स्ट क्लास सामन्यात शाहने नाबाद २५६ धावांची खेळी केली होती. त्यावेळी कमी वयात द्विशतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला होता.

पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा बहीर शाह दुसरा खेळाडू ठरला होता. मुंबईच्या अमोल मुझुमदारने पदार्पणात २६० धावा केल्या होत्या.