मोठी बातमी: भारताला मोठा धक्का, पृथ्वी शॉ कसोटी मालिकेतून बाहेर

पर्थ। भारताचा युवा 19 वर्षीय सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. तो पायाच्या घोट्याच्या दुखापतीतून अजून सावरला नसल्याने त्याला पून्हा भारतात पाठवण्यात आले आहे. तसेच त्याच्या ऐवजी उर्वरित कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मयंक अगरवालची निवड करण्यात आली आहे.

शॉ आॅस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्याआधी  सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आॅस्ट्रेलिया एकादश विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या सराव सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता.

त्याला या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना बाउंड्री लाइनच्या जवळ मिड-विकेटला असताना झेल घेण्याच्या प्रयत्नात डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला लगेचच दवाखान्यात नेण्यात आले होते. त्याला मैदानातूनही भारतीय संघाच्या मेडिकल टीमने अक्षरश: उचलुन ड्रेसिंगरुममध्ये नेले होते.

19 वर्षीय शॉने या सामन्यात पहिल्या डावात 69 चेंडूत 66 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

या दुखापतीतून तो तिसऱ्या कसोटीपर्यंत बरा होईल अशी सर्वांचीच आपेक्षा होती. तसेच भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही तो मेलबर्न कसोटीपर्यंत दुखापतीतून बाहेर येईल अशी आशा व्यक्त केली होती. मात्र तो या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नसल्याने संघव्यवस्थापनाने त्याला पून्हा भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याच्या ऐवजी निवड झालेला मयंत अगरवाल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून जर त्याला मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी संधी मिळाली तर हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

त्याने आत्तापर्यंत 45 प्रथम श्रेणी सामने खेळले असून यात त्याने 50.30 च्या सरासरीने 3521 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहली-पेनमधील वाद काही मिटेना, अखेर मैदानावरील अंपायरनेच केली मध्यस्थी

कोणीही विचार केला नसेल अशा गावसकरांच्या नकोशा विक्रमाची केएल राहुलने केली बरोबरी

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीही न झालेली धावसंख्या टॉम लेथमने केली