या ५ कारणांमुळे भारतीय संघ झाला पराभूत !

मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला काल सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडने ६ विकेट्सने दारुण पराभव केला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील ३१वे शतक पूर्ण केले, पण न्यूझीलंडच्या रॉस टेलर व टॉम लाथम यांच्या विक्रमी भागीदारीने विराटच्या शतकावर पाणी फिरले.

पहा काय आहेत ती ५ कारणे ज्यांमुळे भारताला कालच्या सामन्यात स्वीकारावी लागली हार !

१. रॉस टेलर व टॉम लाथम यांची विक्रमी भागीदारी !
भारताने प्रथम फलंदाजी करताना २८१ धावांचे लक्ष यजमानांपुढे ठेवले होते. त्यांनतर गोलंदाजीमध्येही भारताने उत्तम कामगिरी करत न्यूझीलंडचा स्कोर १८ षटकात ८० धावांवर ३ बाद असा केला. पण त्यानंतर मैदानात उतरला न्यूझीलंडच्या या संघातील सर्वात अनुभवी फलंदाज रॉस टेलर. गुप्टिल आणि विल्म्सन यासारख्या अनुभवी फलंदाज तंबूत परतल्या नंतर रॉस टेलर व टॉम लाथम यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला.

भारतीय संघालाही माहित होते जर त्यांनी ही जोडी लवकर फोडली नाही तर त्यांना या सामन्यात पुनरागमन करणे अवघड जाणार आहे आणि तसेच झाले. ८० वर ३ बाद वरून या दोघांनी संघाला २८० पर्यंत नेले. अखेर भारतीय गोलंदाजांना रॉसची विकेट मिळाली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

२. डाव्या हाताचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट
भारताचे दोन्ही सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि रोहित शर्मा हे त्यांच्या आक्रम शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पण रविवारच्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर थोडे लवरच आक्रमण करण्यास सुरुवात केली. दोन्ही फलंदाज सेट न होताच फटके खेळायला लागेल.

सध्या भारतीय संघात एकही डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज नाही. त्यामुळे भारताच्या फलंदाजांना डावखुऱ्या गोलंदाजांना खेळण्याचा अनुभव नाही. मागील काही मालिकेत भारतीय फलंदाज डाव्या हाताच्या गोलंदाजांच्या समोर साफ अपयशी ठरले आहेत. रविवारीही हेच घडले. ट्रेंट बोल्टने १० षटकात फक्त ३५ धावा देऊन ४ भारतीय फलंदाजांना बाद केले.

३. फलंदाजीत ३० धावा कमी
प्रथम फलंदाजी करताना भारताने वानखेडेसारख्या सपाट मैदानावर फक्त २८० धावा केल्या. भारताच्या कर्णधाराने शतकी खेळी केली पण संघातील बाकी कोणत्याच खेळाडूला अर्धशतकही करता आले नाही.

दोनीही सलामीवीर फलंदाज अयशस्वी ठरल्यानंतर विराटने भारताचा डाव सांभाळला. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नियमित कालांतराने दुसऱ्या बाजूने विकेट्स घेतल्या. चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा प्रश्न अजूनही भारताच्या कर्णधारला सुटलेला नाही. त्यामुळेच भारत ३०० धावांचा पल्ला पार करू शकला नाही.

४. मधल्या फळीने नांगी टाकली
वेस्टइंडीज मालिकेनंतर भारतीय संघात पुनरागमन करणारा दिनेश कार्तिक आणि भारताच्या मधल्या फळीतील सर्वात अनुभवी फलंदाज महेंद्रसिंग धोनी दोघेही मोक्याच्या क्षणी बाद झाले. त्यानंतर मैदानात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आला त्याला ही बोल्टने तंबूत परत पाठवले.

दिनेश (३७),धोनी (२५) आणि पंड्या (१६) यांपैकी कोणताही एक फलंदाज जर विराटबरोबर शेवटच्या षटकापर्यंत टिकला असता तर भारताचा स्कोर ३०० पार गेला असता.

५. कमी अनुभवी फिरकी गोलंदाज
संघात रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या जागी खेळणारे यज्वेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांची अनुभवहीनता कालच्या सामन्यात दिसून आली.
कालच्या सामन्यात भारताने दुसरी गोलंदाजी केली आणि भारताच्या संघात दोन्ही रिस्ट स्पिनर होते. दव पडल्यामुळे चेंडू हातून सटकत होता. त्यामुळे दोन्ही फिरकी गोलंदाज चांगला खेळ करू शकले नाही. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांना म्हणाव तस यश मिळाले नाही.