पहिली वनडे: संकटमोचन धोनी आला भारतीय संघाच्या मदतीला धावून, भारताच्या सर्वबाद ११२ धावा

धरमशाला| येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने ३८.२ षटकात सर्वबाद ११२ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज एम एस धोनीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

या सामन्यात भारताची फलंदाजी पात्याच्या बंगल्यासारखी कोसळली. भारताचे सलामीवीर शिखर धवन(०) आणि रोहित शर्मा(२) लवकर बाद झाले. त्यांच्या पाठोपाठ दिनेश कार्तिक(०), मनीष पांडे(२), आज वनडे पदार्पण करणारा श्रेयश अय्यर(९), हार्दिक पंड्या(१०) आणि भुवनेश्वर कुमार(०) यांनी देखील आपले बळी लवकर गमावले.

एक वेळ भारताची अवस्था ७ बाद २९ धावा अशी झाली होती. त्यामुळे अनुभवी फलंदाज असलेल्या धोनीवर आणि नोवोदित खेळाडू कुलदीप यादववर भारताचा डाव सांभाळण्याची जबाबदारी होती.

या दोघानीं ४१ धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु कुलदीप १९ धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराह धोनीबरोबर खेळपट्टीवर थोडावेळ उभा राहिला मात्र त्याने एकही धाव काढता आली नाही अखेर त्याला सचित पथीराने त्रिफळाचित केले.

धोनीने मात्र ‘वन मॅन आर्मी’ प्रमाणे खेळपट्टीवर टिकून होता त्याने सुरवातीला बचावात्मक पवित्रा घेतला होता त्यानंतर मात्र त्याने आक्रमक खेळाला सुरुवात केली परंतु त्याला बाकीच्या फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही अखेर तो ८७ चेंडूंत ६५ धावा करून बाद झाला. त्याने त्याच्या या खेळीत १० चौकार आणि २ षटकार मारले.

श्रीलंकेकडून सुरंगा लकमल (४/१३), अँजेलो मॅथ्यूज(१/८), नुवान प्रदीप(२/३७), थिसेरा परेरा (१/२९), अकिला धनंजया(१/७) आणि सचित पथीरा(१/१६) यांनी बळी घेतले.

तत्पूर्वी श्रीलंका कर्णधार थिसेरा परेराने या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयाचा श्रीलंकन गोलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला.