पहिली वनडे: भारताचा श्रीलंकेकडून ७ विकेट्सने पराभव

धरमशाला। येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने ७ विकेट्सने भारतावर विजय मिळवून ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताने दिलेल्या ११३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने सलामीवीर दनुष्का गुनथालिकाला यष्टीरक्षक एम एस धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले.

त्यानंतर लगेचच बुमराहनेच उपुल थरंगाला बाद केले होते परंतु हा चेंडू नो बॉल असल्याने थरंगाला जीवदान मिळाले. या जीवदानाला फायदा उचलत थरंगाने ४९ धावा केल्या. त्याला हार्दिक पंड्याने शिखर धवन करवी झेलबाद केले. त्याच्या आधी भुवनेश्वर कुमारने लाहिरू थिरिमन्नेला त्रिफळाचित करून शून्य धावेवर बाद केले होते.

अखेर अँजेलो मॅथ्यूज आणि निरोशन डिकवेल्ला यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. त्यांनी ४९ धावांची भागीदारी करत श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करत भारताला ११२ धावातच सर्वबाद केले होते. भारताकडून एम एस धोनीने अर्धशतकी खेळी केली. त्याने ८७ चेंडूत ६५ धावा केल्या. त्याच्या या खेळीत त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले.

मजबूत फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संघाची अवस्था श्रीलंकन गोलंदाजांनी बिकट केली होती. भारताकडून धोनीने आणि कुलदीप यादवने चांगली लढत दिली. कुलदीपने धोनीची साथ देताना १९ धावा केल्या. धोनी आणि कुलदीपने एक वेळ भारताची २९ धावात ७ बाद अशी अवस्था असताना ४१ धावांची भागीदारी रचली.

भारताच्या बाकीच्या फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. भारताकडून रोहित शर्मा(२),मनीष पांडे(२), श्रेयश अय्यर(९), आणि हार्दिक पंड्या(१०) यांनी धावा केल्या. तर शिखर धवन,दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह शून्य धावांवर बाद झाले. युजवेंद्र चहल शून्यावर नाबाद राहिला.

श्रीलंकेकडून सुरंगा लकमल (४/१३), अँजेलो मॅथ्यूज(१/८), नुवान प्रदीप(२/३७), थिसेरा परेरा (१/२९), अकिला धनंजया(१/७) आणि सचित पथीरा(१/१६) यांनी बळी घेतले.