भारत-श्रीलंका कसोटी सामना अनिर्णित

कोलकाता। भारत विरुद्ध श्रीलंका संघात झालेला पहिला कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात पावसाचा व्यत्यय आला होता त्यामुळे सामन्याचे पहिले दोनही दिवस वाया गेले. आज सामन्याचा शेवटचा दिवस होता. दिवसाखेर श्रीलंकेने दुसऱ्या डावात ७ बाद ७५ धावा केल्या.

भारताने पहिल्या डावातील पिछाडी नंतरही श्रीलंकेला २३० धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांकडून मात्र निराशा झाली. अँजेलो मॅथुज(१२), दिनेश चंडिमल(२०) आणि निरोशन डिकवेल्ला(२७) यांनी धावा केल्या. बाकीच्या फलंदाजांना तर प्रत्येकी १० धावाही करता आल्या नाही. अखेर श्रीलंका ७ बाद ७५ धावांवर खेळत असताना पंचानी सामना अनिर्णित घोषित केला.

भारताकडून भुवनेश्वर कुमार(४/०८),मोहम्मद शमी(२/३४) आणि उमेश यादव (१/२५) यांनी बळी घेतले.

तत्पूर्वी भारताने दुसऱ्या डावात खेळताना उत्तम खेळ केला. भारताचे दोन्हीही सलामीवीर लोकेश राहुल (७९) आणि शिखर धवन (९४) यांनी१६६ धावांची दीडशतकी भागीदारी रचली. धवनचे मात्र ६ धावांनी शतक हुकले.

त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आपले कसोटी क्रिकेटमधील १८ वे तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५०वे शतक साजरे करताना ११९ चेंडूत आक्रमक नाबाद १०४ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार आणि २ षटकार बघायला मिळाले. त्यानंतर मात्र बाकीच्या फलंदाजांना खास काही करता आले नाही.

श्रीलंकेकडून सुरंगा लकमल(३/९३), लाहिरू गामागे(१/९७),दसून शनका(३/७६) आणि दिलरुवान परेरा(१/४९) यांनी बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक:

भारत पहिला डाव: सर्वबाद १७२ धावा
श्रीलंका पहिला डाव: सर्वबाद २९४ धावा
भारत दुसरा डाव: ८ बाद ३५२ धावा (घोषित)
श्रीलंका दुसरा डाव: ७ बाद ७५ धावा

सामनावीर: भुवनेश्वर कुमार (पहिला डाव ४ बळी ८८ धावात आणि ४ बळी ८ धावात)