एकाच दिवशी ३ दुबळ्या संघांनी ३ दिग्गज संघांना चारली पराभवाची धूळ

रविवारी खेळलेल्या गेलेल्या तीन वेगवेगळ्या क्रिकेट सामन्यांमध्ये तीन धक्कादायक निकाल लागले.

यामध्ये आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बलाढ्य इंग्लंडला नवख्या  स्कॉटलंडने एकदिवसीय सामन्यात सहा धावांनी पराभूत केले. तर महिला टी-20 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारतावर शेवटच्या षटकात थरारक विजय मिळवला.त्रिनीदादमध्ये विंडीजने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला 226 धावांनी पराभूत केले.

स्कॉटलंड विजयी विरुद्ध इंग्लंड

स्कॉटलंड दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघाला रविवारी खेळल्या गेलेल्या एकमेव एकदिवसीय सामन्यात स्कॉटलंडने 6 धावांनी पराभूत केले. इंग्लंडचा कर्णधार इअॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने 50 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात विक्रमी 371 धावांचा डोंगर उभा केला. स्कॉटलंडच्या कॅलम मॅक्लीओडने 94 चेंडूत सोळा चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 140 धावा केल्या. 372 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 48.5 षटकात सर्वबाद 365 पर्यंत मजल मारली.

बांगलादेश विजयी विरुद्ध भारत

महिला टी-20 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारतीय संघाचा शेवटच्या षटकात पराभव करत पहिल्यांदाच आशिया चषक आपल्या नावे केला. भारतीय संघाचे 113 धावांचे आव्हान बांगलादेशने 20 व्या षटकाच्या अंतिम चेंडूवर पूर्ण केले. आजपर्यंत झालेल्या सहा पैकी सहा आशिया चषकात भारताने विजय प्राप्त केले होते. यावेळी मात्र बांगलादेशने भारताचा विजयरथ रोखला.

विंडिज विजयी विरुद्ध श्रीलंका

तर तिकडे त्रिनिदादमध्ये विंडीज दौऱ्यावर अललेल्या श्रीलंकेला विंडीजने 226 धावांनी पराभूत केले. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विंडीजने 1-0 अशी आघाडी मिळवली. पहिल्या डावातील 229 धावांच्या आघाडीच्या जोरावर विडींजने श्रीलंकेला पराभूत केले. या सामन्यावर विंडीजने पहिल्या दिवशी घेतलेली पकड कायम ठेवत मोठा विजय मिळवला.