विराट तेव्हा करणार वनडेत द्विशतक

दिल्ली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या सर्वच प्रकारात गेल्या काही वर्षांपासून जबदस्त कामगिरी केली आहे. वनडे पाठोपाठ हा खेळाडू आता कसोटीतही मोठ्या खेळी करू लागला आहे. परंतु तिसऱ्या क्रमांकावर वनडेत खेळायला येणाऱ्या विराटच्या नावावर अजून वनडेत द्विशतक नाही.

२०२ वनडे सामन्यात तब्बल ३२ शतके करणाऱ्या विराटचा वनडेत सर्वोच्च स्कोर आहे १८३. काल दिल्ली कसोटीत द्विशतकी खेळी केल्यावर बीसीसीआय टीव्हीसाठी चेतेश्वर पुजाराने विराटची मुलाखत घेतली. त्यात चेतेश्वरने विराटला विचारले की वनडेत द्विशतक करण्याबद्दल तुझे काय विचार आहेत? ते तुझं पुढील लक्ष आहे का?

यावर विराट म्हणतो, ” मी याबद्दल काही विचार केला नाही. सलामीला येणाऱ्या फलंदाजांना वनडेत द्विशतक करायची मोठी संधी असते. जर खेळपट्टी चांगली असेल आणि लवकर संधी मिळाली तर हे होऊ शकते. जर आम्ही प्रथम फलंदाजी करत असू आणि मला लवकर संधी मिळाली तर हे होऊ शकते. परंतु त्यासाठी आमचा सलामीचा फलंदाज लवकर बाद व्हावा असे मला वाटत नाही. कारण सलामीवीर चांगले खेळले तर संघाला चांगली सुरुवात मिळते. “

“मी वनडेत द्विशतकच्या दोन वेळा जवळ पोहचलो आहे. परंतु ते नाही जमले. रोहितने ही कामगिरी दोन वेळा केली आहे. डावाच्या उत्तार्धात मी रोहित सारखी फटकेबाजी करेल असे वाटत नाही. रोहित १३०-१४० पर्यंत पोहचला की त्याला थांबवणे अवघड आहे. त्यामुळेच तो ही कामगिरी करू शकला आहे. परंतु मी प्रयत्न करू शकतो. “

जगात आजपर्यंत ज्या खेळाडूंनी वनडेत द्विशतके केली आहेत ते सर्व सलामीला येऊन ही कामगिरी करू शकले आहेत. असे असतानाही विराटने एकदा १८३ तर एकदा नाबाद १५४ धावा केल्या आहेत.

विराटने २०२ वनडे सामन्यात ५५.७४च्या सरासरीने ३२ शतके आणि ४५ अर्धशतकांच्या मदतीने तब्बल ९०३० धावा केल्या आहेत.