हे आहेत भारताचे यावर्षीचे टॉप ५ गोलंदाज !

भारतीय संघाने २०१७ मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारात चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः भारतीय गोलंदाजांनी अनेकदा भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

भारतीय संघ २०१७ मध्ये एकूण ५३ सामने खेळला. त्यात संघाला ३७ सामन्यात विजय तर १२ सामन्यात भारताला पराभव मिळाला. तसेच ३ सामने अनिर्णित राखण्यात संघाला यश मिळाले आहे; आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही.

यावर्षी सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये भारताचे आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन गोलंदाज आहेत. तसेच यावर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारात मिळून ५० पेक्षा जास्त बळी घेणाऱ्यांमध्ये अश्विन, जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे तीन भारतीय गोलंदाज आहेत.

भारताकडून चमकदार कामगिरी करणारे हे टॉप ५ गोलंदाज :

१. आर अश्विन: भारताचा फिरकी गोलंदाज अश्विन यावर्षी २१ सामने खेळला. यात त्याने ३० डावात गोलंदाजी करताना ३१.४६ च्या सरासरीने ६४ बळी घेतले आहेत. तसेच त्याने यावर्षी ६६३ षटके टाकली आहेत. त्यात त्याने १२० षटके निर्धाव टाकली आहेत. याबरोबरच त्याने ६४ बळी घेताना २०१४ धावा दिल्या आहेत.

अश्विन यावर्षी सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहे.

अश्विनने यावर्षी २ वेळा ५ पेक्षा जास्त बळी घेण्याचीही कामगिरी केली आहे. यावर्षी त्याला मर्यादित षटकांच्या अनेक सामन्यांसाठी संघाच्या बाहेर ठेवण्यात आल्यामुळे तो यावर्षी कसोटी क्रिकेट जास्त खेळला. भारतीय संघ यावर्षी ११ कसोटी सामने खेळला या ११ पैकी ११ कसोटीत अश्विन खेळला आहे. त्याने यावर्षी कसोटीत ५६ बळी मिळवत कसोटी कारकिर्दीत ३०० बळी घेण्याचा टप्पा पार केला आहे.

२. रवींद्र जडेजा: यावर्षी जडेजानेही चांगली कामगिरी करताना २०१७ च्या सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्रमवारीत सहावे स्थान मिळवले आहे. तो यावर्षी २१ सामन्यात खेळला आहे. यात त्याने ३१ डावात गोलंदाजी करताना २८.५० च्या सरासरीने ६२ बळी घेतले आहेत.तसेच त्याने यावर्षी ६०४ षटके गोलंदाजी करताना १७६७ धावा दिल्या आहेत.

जडेजाने यावर्षी तब्बल १३१ षटके निर्धाव टाकली आहेत. याबरोबरच ३ वेळा एका डावात ५ बळी बाद केले आहेत. अश्विन प्रमाणेच यावर्षी जडेजालाही मर्यादित षटकांच्या बऱ्याच सामन्यांसाठी संधी मिळाली नाही. जडेजाही यावर्षीचे सर्व ११ पैकी ११ कसोटी सामने खेळला आहे.

याबरोबरच अश्विन आणि जडेजाने मार्च महिन्यात आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत विभागून अव्वल स्थान मिळवले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन फिरकी गोलंदाजांनी एकाचवेळी अव्वल स्थानावर येण्याची ती पहिलीच वेळ होती.

३. जसप्रीत बुमराह: यावर्षी भारतीय जलदगती गोलंदाज बुमराह ३४ सामन्यात खेळला आहे. यात त्याने गोलंदाजी करताना २४.७८ च्या सरासरीने १२६४ धावा देऊन ५१ बळी मिळवले आहेत. यात त्याने १३ षटके निर्धाव टाकली आहेत.

बुमराहाचे अजून कसोटी पदार्पण झाले नसल्याने तो सध्या भारताकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळतो. पण त्याने यावर्षी केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय कसोटी संघात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी प्रथमच स्थान मिळवले आहे.

४. उमेश यादव: भारताचा जलदगती गोलंदाज उमेश यादवने यावर्षी चांगली कामगिरी करताना १९ सामन्यात २८.१५ च्या सरासरीने १२९५ धावा देत ४६ बळी मिळवले आहेत. त्याने यावर्षी एकूण ३४० षटके टाकली आहेत. त्यात त्याने ४९ षटके निर्धाव टाकली आहेत.

उमेशने यावर्षी भारताकडून १० कसोटी आणि ९ वनडे सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २० डावात गोलंदाजी करताना ३१ बळी घेतले आहेत आणि वनडेत १५ बळी मिळवले आहेत. यावर्षी भारताकडून सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये उमेश चौथ्या स्थानी आहे.

५. युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार: यावर्षी भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चहल आणि भुवनेश्वर हे दोन्ही गोलंदाज पाचव्या क्रमांकावर आहेत. दोघांनीही यावर्षी प्रत्येकी ४४ बळी मिळवले आहेत.

चहलने यावर्षी २५ सामने खेळले आहेत. यात २४ डावात गोलंदाजी करताना २१.०२ च्या सरासरीने ४४ बळी मिळवले आहेत. त्याने यावर्षी १६२ शतके गोलंदाजी करताना ९२५ धावा केल्या आहेत.

याबरोबरच चहल यावर्षीचा टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे त्याने ११ सामन्यात २३ बळी घेतले आहेत. चहलचे अजून कसोटी पदार्पण झालेले नाही.

चहलबरोबरच भुवनेश्वरनेही यावर्षी चांगली कामगिरी करताना ३४ सामन्यांमध्ये ३६ डावात ३०. ६८ च्या सरासरीने ४४ बळी घेतले आहेत. त्याने यावर्षी एकूण २९८ षटके गोलंदाजी केली आणि १३५० धावा दिल्या आहेत.