एकवेळ मुंबई इंडियन्सकडून खेळलेला हार्दीक पंड्या आता खेळणार मुंबई विरुद्ध

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्याची सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत गट अ मधील मुंबई विरुद्ध बडोदा संघात निवड झाली आहे. हा सामना 14 डिसेंबरपासून मुंबईत होणार आहे.

हार्दिकची निवडीबद्दल बडोदा क्रिकेट असोसिएशनचे प्रभारी सचिव स्नेहल पारिख यांनी पुष्टी दिली आहे.

हार्दिकला संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडलेल्या एशिया कप स्पर्धेत पाठीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला सध्या सुरु असलेल्या भारताच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यालाही मुकावे लागले आहे. त्याने क्रिकेटमध्ये परतण्यासाठी काही दिवसांपूर्वी सरावाला सुरुवात केली आहे.

बडोदा संघात हार्दिक अष्टपैलू बाबाशफी पठाणची जागा घेईल. 15 जणांच्या बडोदा संघात हार्दिकसह युसुफ पठाणचाही अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून समावेश करण्यात आला आहे. तसेच लूकमन मरीवाला, रिशी आरोठे, कर्णधार केदार देवधर या वेगवान गोलंदाजांचाही समावेश आहे.

या मोसमात आत्तापर्यंत बडोदाने 5 सामने खेळले असून एक सामना जिंकला आहे आणि एका सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. अ आणि ब गटाच्या मिळून गुणतालिकेत ते 13 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

असा आहे बडोदा संघ-

केदार देवधर(कर्णधार), अदित्य वाघमोडे, विष्णू सोलंकी (उपकर्णधार), युसुफ पठाण, स्वप्निल सिंग, भार्गव भट, शोएब ताई, रिशी आरोठे, लुकमन मरीवाला, शिवालिक शर्मा, मितेश पटेल (यष्टीरक्षक), धिरेन मिस्त्री, शोएब सोपारिया, प्रत्यूश कुमार आणि हार्दिक पंड्या.