६४ वी राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धा- महाराष्ट्राला रोड सायकलिंगमध्ये सर्वसाधारण विजेतेपद

पुणे । महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी चमकदार कामगिरी करताना भारतीय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि सायकलिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६४ व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत रोड प्रकारात ५३ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

रोड सायकलिंगचे प्रकार हिंजवडी फेज-२ आणि फेज-३ भागात विप्रो कंपनी गेट ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस दरम्यान एकेरी मार्गावर झाले. या स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात झारखंड संघ १० गुणांसह अव्वल स्थानावर राहिला, तर १४ वर्षांखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघ १६ गुणांसह अव्वल स्थानी राहिला. यानंतर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात दिल्लीचा संघ ७ गुणांसह अव्वल स्थानी राहिला, तर मुलींच्या गटात महाराष्ट्राने बाजी मारली. महाराष्ट्राने १३ गुण मिळवले. स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र संघ १० गुणांसह अव्वल स्थानी राहिला, तर मुलींच्या गटात कर्नाटकने (१० गुण) अव्वल स्थान मिळवले.

महाराष्ट्राने १४ वर्षांखालील मुलांच्या गटात ६, मुलींच्या गटात १६, १७ वर्षांखालील मुलांच्या गटात ६, मुलींच्या गटात १३, १९ वर्षांखालील मुलांच्या गटात १०, मुलींच्या गटात २ असे एकूण ५३ गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. केरळच्या संघाने २६ गुणांसह सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले.

म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात शुटिंग हॉलमध्ये स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. यावेळी एसजीएफआयचे कन्हैया गुर्जर, संजय साठे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, दिपाली पाटील, प्रताप जाधव, दिपाली शिळदणकर, संजय सातपुते, मिनाक्षी ठाकूर आदी उपस्थित होते. रोड सायकलिंगसाठी महाराष्ट्राचे प्रशिक्षक व व्यवस्थापक दिपाली पाटील, दिपाली शिळदणकर, प्रशिक्षक दर्शन बारगुजे, व्यवस्थापक साईनाथ थोरात यांनी राज्याच्या क्रीडापटूंना मार्गदर्शन केले.

ट्रॅक सायकलिंगचे प्रकार मंगळवारपासून (दि.१२)
ट्रॅक सायकलिंग स्पर्धा दि. १२ व १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ट्रॅकमधील स्पर्धेत टाइम ट्रायल, इंडिव्हिज्युअल परसूट, टीम स्प्रिंट, टीम परसूट आदी प्रकार समाविष्ट करण्यात आले आहेत. ट्रॅकचे प्रकार म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलातील वेलोड्रम स्टेडियममध्ये होणार आहेत. ट्रॅक प्रकारात होणारी ही स्पर्धा १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले-मुलींच्या गटात होईल. स्पर्धेत यजमान महाराष्ट्रासह आसाम, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, झारखंड, मणिपूर, छत्तीसगड या ११ राज्यांतील १६१ खेळाडूंचा सहभाग असणार आहे.

ट्रॅक :- महाराष्ट्र संघ – सायकलिंग ट्रॅक – १४ वर्षांखालील मुले – अथर्व पाटील (पुणे, ५०० मी. टाइम ट्रायल), वीरेंद्रसिंह पाटील (पुणे, ५०० मी. टाइम ट्रायल), कार्तिक कुंभार (पुणे, २ किमी इंडिव्हिज्युअल परसूट), हर्षल पडघन (पुणे, २ किमी इंडिव्हिज्युअल परसूट). मुली – सिद्धी शिर्के (पुणे, ५०० मी. टाइम ट्रायल), सुहानी मोरे (सांगली, ५०० मी. टाइम ट्रायल), सॅनूरी लोपेस (ठाणे, २ किमी इंडिव्हिज्युअल परसूट), झानिया पिरखान (ठाणे, २ किमी इंडिव्हिज्युअल परसूट).

सायकलिंग ट्रॅक – १७ वर्षांखालील मुले – दीपक मुकणे (पुणे, टीम स्प्रिंट, ५०० मी. टाइम ट्रायल), ओंकार दीक्षित (पुणे, टीम स्प्रिंट, ५०० मी. टाइम ट्रायल), रोहित पाटोळे (पुणे, टीम स्प्रिंट, २ किमी इंडिव्हिज्युअल परसूट), प्रथमेश हजारे (पुणे, २ किमी इंडिव्हिज्युअल परसूट). मुली – मानसी कमलाकर (पुणे, टीम स्प्रिंट, ५०० मी. टाइम ट्रायल), वैष्णवी पिल्लई (मुंबई, ५०० मी. टाइम ट्रायल), अंजली रानवडे (पुणे, टीम स्प्रिंट, २ किमी इंडिव्हिज्युअल परसूट), अदिती डोंगरे (पुणे, टीम स्प्रिंट, २ किमी इंडिव्हिज्युअल परसूट).

सायकलिंग ट्रॅक – १९ वर्षांखालील मुले – भूषण चव्हाण (पुणे, ३ किमी टीम परसूट, १ किमी टाइम ट्रायल), प्रणव कांबळे (पुणे, टीम स्प्रिंट, ४ किमी इंडिव्हिज्युअल परसूट, ३ किमी टीम परसूट), कृष्णा हराळ (अहमदनगर, टीम स्प्रिंट, ४ किमी इंडिव्हिज्युअल परसूट, ३ किमी टीम परसूट), ओंकार आंग्रे (पुणे, ३ किमी टीम परसूट, १ किमी टाइम ट्रायल). मुली – सई जोंधळे (पुणे, टीम स्प्रिंट, ५०० मी. टाइम ट्रायल), सुप्रिया कदम (पुणे, ५०० मी. टाइम ट्रायल), जेनिस परेरा (मुंबई, टीम स्प्रिंट, ३ किमी इंडिव्हिज्युअल परसूट), ईशिका भेलके (पुणे, ३ किमी इंडिव्हिज्युअल परसूट).

महत्त्वाच्या बातम्या- 

काल टीम इंडिया पराभूत झाली, आज कुलदीपला मिळाली ही गुड न्यूज

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत ४ भारतीय गोलंदाजांची शतके

आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच

…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा