सचिन आणि शारजामधील ती वादळी खेळी

२१ वर्षांपूर्वी २२ एप्रिल १९९८ ला संयुक्त अरब अमीरातीमधील शारजाच्या मैदानावर भारताचा तेव्हाचा उभारता सितारा खेळत होता जो पुढे जाऊन या खेळाचा देवता बनला. त्याचे नाव म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिनचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील चौदावे शतक होते. पण हे शतक त्याच्या आता कोणत्याही क्रिकेटमधल्या खेळीपेक्षा खूप मोठे होते.

टोनी ग्रेगने सामन्याचे समालोचन करताना सचिनच्या अविस्मरणीय खेळीचे विश्लेषण करत “काय विस्मयकारक खेळाडू “, असे उद्गारही काढले होते.

कोका कोला कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारतापुढे त्या काळचा हरवण्यास सर्वात अवघड संघ आणि त्या स्पर्धेतील एकही सामना न हरणारा संघ होता तो म्हणजे ऑस्ट्रेलिया .

२२ एप्रिल १९९८ ला भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध शारजाच्या ऐतिहासिक मैदानावर होणार होता. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना एका सराव सामन्यासारखा होता कारण त्याचा संघ आधीच अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदजी करत मायकल बेव्हनच्या १०१ धावांच्या जोरावर २८४ धावांचा डोंगर भारतासमोर रचला होता. सचिन तेंडुलकरने त्या सामन्यात गोलंदाजी करताना ५ षटकात २५ धाव देत एक गडी बाद केला होता. सचिनसाठी हा सामना खूप महत्वाचा होता कारण त्याच्याकडून सर्व भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा होती .

या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली हे भारताचे तेव्हाचे सलामीची फलंदाज धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरण्याच्या आधीच मैदानात वाळूचे वादळ आले आणि सामना काही काळ स्थगित करावा लागला होता.

जेव्हा भारत पुन्हा धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा भारताला ४६ षटकात २७६ धावा करायच्या होत्या पण भारतासाठी खरे लक्ष्य होते ते ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर निदान २३७ धावा करुन न्यूझीलंडपेक्षा चांगला नेटरनरेट ठेऊन अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित करणे.

या सामन्यात सचिनने तेव्हा आपला उत्तोमोत्तम खेळ केला आणि भारताला अंतिम सामन्यात जाण्यास पात्र ठरवले. विशेष म्हणजे या सामन्यात सचिन जेव्हा बाद जाला तेव्हा पंचानी त्याला बाद दिले नव्हते तरी सचिन खेळाडूवृत्ती दाखवून पॅविलनमध्ये परतला होता. कदाचित यामुळेच भारताला हा सामना जिंकता आला नाही पण सचिनने जगाला आपल्या बॅटची जादू दाखून दिली होती. त्याकाळचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला शेन वॉर्नला ही सचिनने सुट्टी दिली नाही .

सचिनने त्या सामन्यात १९७ मिनिटे फलंदाजी करत १३१ चेंडूत १४३ धावा केल्या, ज्यात ८ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता , यासामन्यात सामनावीराचा मानही त्यालाच मिळाला होता.

त्यानंतर सचिनने वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २४ एप्रिल १९९८ ला झालेल्या सामन्यात १३४ धावांची खेळी करत भारताचे नाव कोका कोला कपवर कोरले आणि मालिकावीराचा किताबही स्वतःच्या नावे केला .

सचिनच्या त्या शारजावरील शतकांना २१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप शतके केली पण ही दोन शतके नेहमीच प्रत्येक भारतीयांच्या मनात राहणार हे नक्की .

लेखक- आकाश खराडे

(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)