तरीही सचिनचा तो विक्रम अभेद्य, कोणत्याही खेळाडूला हा विक्रम मोडणे अवघड !

मोहाली । काल मोहाली वनडेत रोहित शर्माने वनडेतील तिसरे द्विशतक करत भारताला ३९२ धावा करण्यात मोलाचा वाटा उचलला. भारतीय संघाने वनडेत केलेला हा १००वा ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांचा टप्पा होता.

भारतीय संघाने जेव्हा ३०० धावा केल्या आहेत त्यातील ६९वेळा एमएस धोनी भारतीय संघाचा सदस्य होता. हा एक जागतिक विक्रम आहे. दुसऱ्या क्रमांकावर यात युवराज सिंग(५४) आणि तिसऱ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (५२) आहेत. रिकी पॉन्टिंग आणि एबी डिव्हिल्लर्स हे त्यांच्या संघाने जेव्हाही ३०० धावा केल्यात तेव्हा प्रत्येकी ५०वेळा संघाचे भाग होते.

असे असले तरीही जेव्हाही संघाने ३०० धावा केल्यात तेव्हा त्या डावातील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टरच्याच नावावर आहे. सचिन ज्या ५२ सामन्यात संघाने ३०० धावा केल्या त्या सामन्यात २३ वेळा सर्वोच्च धावा करणारा खेळाडू ठरला आहे. संघाने ज्यावेळी सचिन संघात असताना ३०० धावा केल्या आहेत त्या ५२ सामन्यात सचिनने तब्बल ३९०६ धावा केल्या आहेत.

३०० किंवा जास्त धावा जेव्हा संघाने केल्यात तेव्हा तिलकरत्ने दिलशान संघातील टॉप स्कोरर १४वेळा राहिला आहे. जेमतेम ९वर्ष क्रिकेट कारकीर्द असलेला विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानावर असून त्याने अशी कामगिरी ११वेळा केली आहे.