25000 डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत 25 देशातील खेळाडूंचा सहभाग

स्लोव्हेनियाची तामरा झिदनसेक आणि भारताची अंकिता रैना मानांकित यादीत आघाडीवर

पुणे: नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000 डॉलर बीव्हीजी पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत 25 देशातील खेळाडू सहभागी झाले असून यामध्ये जागतिक क्र.70 असलेल्या स्लोव्हेनियाची तामरा झिदनसेक यासह भारताची अव्वल मानांकित टेनिसपटू अंकिता रैना यांसारखे दिगग्ज खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे दि.24 नोव्हेंबर ते 1डिसेंबर 2018 या कालवधीत होणार असून यामध्ये 25 देशांतील अव्वल खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

चीनची जिया-जिंग लु, भारताची कारमान कौर थंडी, रशियाची ओल्गा दोरोशीना, ग्रेट ब्रिटनची कॅटी ड्युन, जपानची जुनरी नामिगता, इस्राईलची डेनिझ खझानुक हे मानांकित यादीतील अन्य खेळाडू आहेत.

या स्पर्धेला पुणेस्थित बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांनी पाठिंबा दिला असून भारतीय महिला खेळाडू जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी आपला हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. बीव्हीजीचे उपाध्यक्ष व पीएमडीटीएचे उपाध्यक्ष उमेश माने म्हणाले की, या स्पर्धेतून बहुमोल असे डब्लूटीए गुण मिळविणे भारतीय महिलांना शक्य होईल आणि त्यामुळे मानांकन यादीतही त्यांना प्रगती करता येईल.  तसेच, एमएसएलटीएच्या वतीने आणखी 3 स्पर्धा घेण्यात येणार याचा फायदा भारतीय खेळाडूंना नक्कीच होईल.

एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, नवनाथ शेटे संचालित नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमीने या स्पर्धेचे आयोजन केले असून व्यस्त वेळेपत्रकामुळे पुण्याबाहेरच्या स्पर्धा खेळण्यास असमर्थ ठरलेल्या भारतीय महिला खेळाडूंना महत्वपूर्ण गुण मिळविण्यासाठी हि स्पर्धा उपयुक्त ठरेल.

या स्पर्धेचे उदघाटन दि.25 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी 4वाजता माजी कृषी मंत्री शशिकांत सुतार यांच्या हस्ते होणार आहे.

स्पर्धा संचालक नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमीचे नवनाथ शेटे म्हणाले की,  या स्पर्धेत सहभागासाठी गुणवान भारतीय खेळाडूंना वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश देण्यात आला आहे. या खेळाडूंमध्ये स्नेहल माने, ऋतुजा भोसले, रिया भाटिया, जेनिफर लुईखेम या खेळाडूंना मुख्य ड्रॉमध्ये वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले आहेत. मिहिका यादव, तेजस्विनी काटे, हुमेरा शेख, नताशा पल्हा, प्रतिभा प्रसाद, सौजन्या बाविशेट्टी या खेळाडूंना पात्रात फेरीत वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले आहेत.

या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 50 डब्लुटीए गुण, उपविजेत्याला 30 डब्लुटीए गुण देण्यात येणार असल्याचे शेटे यांनी नमुद केले.

आयटीएफ गोल्ड बॅच रेफ्री शितल अय्यर यांची आयटीएफ महिला अजिंक्यपद स्पर्धेसाठी रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 24 व 25 नोव्हेंबर रोजी होणार असून मुख्य फेरीस सोमवार दि.26 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. 

खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया),अंकिता रैना(भारत), जिया-जिंग लु(चीन), कारमान कौर थंडी(भारत), ओल्गा दोरोशीना(रशिया) , कॅटी ड्युन(ग्रेट ब्रिटन), जुनरी नामिगता(जपान),  डेनिझ खझानुक(इस्राईल).