जाणून घ्या दुसरे हिंद केसरी पै. गणपतराव आंदळकर यांच्याबद्दल…

महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभर कोल्हापूरच्या लाल मातीतील कुस्तीचा डंका गाजवणारे ख्यातनाम नाव म्हणजे माजी हिंद केसरी पैलवान गणपतराव आंदळकर. “कुस्ती हाच माझा प्राण आणि तालीम हा माझा श्वास आहे” हे ब्रीदवाक्य म्हणत त्यांनी संपूर्ण आयुष्य कुस्तीला वाहिले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती पढंरी म्हणून कोल्हापूरला नावलौकिक मिळवून दिले. या कोल्हापुरात १९५० साली गणपतराव सांगली जिह्ल्यातील शिराळा तालुक्यातून पुनवत गावातून कुस्ती शिकण्यासाठी आले. “मोतीबाग” तालमीत बाबासाहेब वीर यांच्याकडे कुस्तीची तालीम सुरु केली. जन्मजात मिळालेल्या बळकट शरीर यष्ठीवर मेहनत घेऊन त्यांनी कुस्तीचा नियमीत सराव केला. जयपराजयाची फिकीर न करता शेकडो कुस्त्या लढल्या आणि बहुतांशी जिंकल्या देखील.

 
१९५८ मध्ये पाकिस्तानचा पैलवान नासिर पंजाबी याला खासबाग मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने त्यांनी धूळ चारली. या विजयानंतर त्यांची यशस्वी कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु झाली. पुन्हा कधी मागे वळून देखील पहिले नाही. १९६० मध्ये पंजाबचे पैलवान खडकसिंग यांचा पराभव करून हिंद केसरीची गदा मिळवली आणि संपूर्ण भारतात कोल्हापूरच्या लालमातीला नावलौकिक मिळून दिले. १९६२ मध्ये जकार्ता एशियाड स्पर्धेत ग्रीको रोमन गटात त्यांनी सुवर्णपदक पटकावले ,तर फ्री स्टाईलमध्ये रौप्य मिळवले. १९६४ मध्ये त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व केले. गणपतरावांनी आपल्या पूर्ण कारकीर्दत २०० हुन अधिक कुस्त्या लढल्या. ४० पेक्षा जास्त कुस्तीत पाकिस्तान मधील मल्लांना त्यांनी धूळ चारली आहे. देशभरात ख्यातनाम कुस्तीपटूंची नावं गाजत असताना गणपतरावांनी कोल्हापूरच्या लाल मातीचा डंका वाजवता ठेवला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत श्रीपाद खांचाळे (पहिले हिंद केसरी ), श्रीरंग जाधव, बनातसिंग पंजाबी यांच्यासह अनेक ख्यातनाम मल्लांशी झुंज दिल्या आहेत.

 
ज्या तालमीत (मोतीबाग) त्यांनी कुस्तीचे धडे घेतले तिथं आज गणपतराव देशासाठी उत्तम कामगिरी करतील असे मल्ल तयार करत आहेत. कुस्ती सारख्या खेळात उत्तम कामगिरी करायची असेल तर पारंपरिक खेळासोबतच आधुनिकतेची पण जोड असायला हवी हे ओळखून गणपतरावांनी ते स्वतः आत्मसात करून ते आज आपल्या शिष्यांना त्याचे प्रशिक्षण देत आहेत. महाराष्ट्रात मॅटवरची कुस्ती आणण्यात गणपतरावांचा मोलाचा वाटा आहे. “महाराष्ट्रातील कुस्तीची परंपरा जपायची असेल तर गाव तिथं तालीम व मॅट असायला हवी आणि कुस्तीगारांनाही सरकारचा आश्रय मिळायला हवा.” असे गणपतराव सांगतात. पहिलवान शरीराने जसा बळकट असावा तस त्याने बुद्धीने ही तल्लख असावे हे गणपतराव म्हणतात. म्हणून ते आपले शिष्य शैक्षणिक पातळीवर कमी पडू नये म्हणून देखील सतत लक्ष देतात. वयाच्या ८३ व्या वर्षी सुद्धा गणपतराव तालमीत येतात आणि मल्ल तयार करण्यात आपले योगदान देत आहेत. आजही गणपतरावांचा दरारा तालमीत कायम आहे. गणपतरावांनी दादू चौगुले , चम्बा मुत्नाळ, विष्णू जोशीलकर, संभाजी पाटील असे अनेक मल्ल तयार करून महाराष्ट्राला दिले आहेत.

 

 

 
गणपतराव यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना सर्वश्रेष्ठ सौष्ठव पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, शिव छत्रपती पुरस्कार, महाराष्ट्र गौरव आणि कोल्हापूर भूषण पुरस्कार मिळाले आहेत. कुस्तीची परंपरा निष्ठेने जपणारा मल्ल आणि वस्तादाच्या ताबंड्या मातीचा गौरव म्हणून दिला जाणारा “राजर्षी छत्रपती शाहू महाराज” पुरस्काराने २०१४ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 
कुस्तीच्या विश्वात स्वतःचे वेगळे स्थान मिळवणरे गणपतराव हे प्रशिक्षक म्हणून जेवढे कडक, कठोर आहेत तेवढेच किमान त्याहून जास्त विनम्र स्वभावाचे आहेत. हे त्यांच्याशी भेटल्यावर जाणवलं.