आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात रंगणार दुसरा वनडे सामना

सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज दुसरा वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. सहा सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारत १-० असा आघाडीवर आहे. आता भारतासमोर ही आघाडी टिकवण्याचे आव्हान असेल.

डर्बन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय होता या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली होती. तसेच अजिंक्य रहाणेने विराटची भक्कम साथ देताना अर्धशतकी खेळी केली होती. गोलंदाजांकडूनही चांगली कामगिरी झाली होती.

या विजयामुळे भारताला आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर येण्याची संधी मिळाली आहे. पण आता हे स्थान आणखी पक्के करण्यासाठी भारताला आज होणाऱ्या सामन्यातही विजय मिळविणे गरजेचे आहे.

याबरोबरच या सामन्यात दक्षिण आफ्रिकाही पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही पहिल्या वनडे सामन्यात शतक झळकावले होते. परंतु तोही दुखापतीमुळे या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या आधीच एबी डिव्हिलियर्स पहिल्या ३ वनडेसाठी दुखापतीमुळे बाहेर आहे.

त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेला डू प्लेसिस आणि डिव्हिलियर्स यांच्या अनुपस्थित खेळावे लागणार आहे. डू प्लेसिस बाहेर पडल्यामुळे २३ वर्षीय एडिन मार्करम दक्षिण आफ्रिकेच नेतृत्व करणार आहे.

विशेष म्हणजे मार्करम आणि विराट या दोघांनीही १९ वर्षांखालील विश्वचषकात नेतृत्व केले आहे आणि दोघांच्याही नेतृत्वाखाली त्यांच्या संघांनी विश्वचषक जिकंले होते. विराटच्या नेतृत्वाखाली २००८ साली तर मार्करमच्या नेतृत्वाखाली २०१४ साली दक्षिण आफ्रिकेने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे.