उद्या रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी २० सामना

इंदोर। उद्या होळकर क्रिकेट स्टेडिअमवर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा टी २० सामना रंगणार आहे. भारताने पहिला टी २० सामना जिंकून ३ सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारताला टी २० मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे.

भारताने काल झालेल्या पहिल्या सामन्यात ९३ धावांनी विजय मिळवला आहे. हा विजय धावांच्या तुलनेतील भारताचा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात युजवेंद्र चहलने ४ बळी घेतले. याबरोबरच तो यावर्षीचा टी २० त सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.

तसेच या सामन्यात फलंदाजांकडूनही चांगली कामगिरी झाली. के एल राहुलने अर्धशतक केले तर एम एस धोनीनेही आक्रमक फलंदाजी केली होती.

उद्या होणाऱ्या सामन्यात प्रथम गोलंदाजी घेण्याने फायदा होईल असे क्युरेटर समंदर सिंग चौहान यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले ” काल इथे ढगाळ वातावरण होते आणि उद्याही असेच वातावरण असेल. उद्या ७.३० किंवा ७.४५ पर्यंत दव पडणार नाही. त्यामुळे पहिल्या १० षटकांवर कोणताही फरक पडणार नाही. तरीही नाणेफेक जिंकून कर्णधारासाठी पहिल्यांदा गोलंदाजी करणे चांगला पर्याय असेल.”

याबरोबरच भारतीय संघात निवड झालेले नवोदित खेळाडू दीपक हुडा, बेसिल थंपी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना उद्या ११ जणांच्या संघात संधी मिळते का हे पाहावे लागेल.  संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरु होणार आहे.