युझवेन्द्र चहल- कुलदीप यादवचे वनडेतील खास कारनामे

पोर्ट एलिझाबेथ । भारताने पाचव्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी पराभूत करत मालिकेत ४-१ अशी आघाडी घेतली. तसेच तब्बल २५ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिकेत विजय मिळवला.

या मालिकेतील ५ सामन्यात भारतीय संघाने आफ्रिकेच्या ४३ विकेट्स घेतल्या. यातील तब्बल ३० विकेट्स भारताच्या रिस्ट स्पिनर्सची जोडी युझवेन्द्र चहल- कुलदीप यादवने घेतल्या आहेत. तर जसप्रीत बुमराहने ६, हार्दिक पंड्याने ३ आणि भुवनेश्वर कुमारने २ असा मिळून ११ विकेट्स घेतल्या आहेत. २ विकेट्स धावबादच्या माध्यमातून मिळाल्या आहेत.

द्विपक्षिय वनडे मालिकेत भारतीय गोलंदाजांनी कधीही २७पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या नव्हत्या. हा कारनामा ह्या जोडीने केला आहे. २००६मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेत भारतीय फिरकी गोलंदाजांनी २७ विकेट्स घेतल्या होत्या.

भारतीय फिरकी गोलंदाजांनी यापूर्वी द्विपक्षिय मालिका सोडून २०११ आणि २००३ च्या विश्वचषकात अनुक्रमे ३४ आणि ३० विकेट्स घेतल्या होत्या. हे दोन्ही विक्रम चहल आणि यादव जोडीला मोडण्याची मोठी संधी आहे.