कोहलीच्या नावावर एक नकोसा असा विक्रम !

दिल्ली । आज येथे सुरु झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु याबरोबर त्याच्या नावावर एक नकोसा असा विक्रमही झाला.

जेव्हा नाणेफेकीवेळी विराटला समालोचक आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी भारतीय संघातील ११ खेळाडूंची नावे विचारली तेव्हा विराटने नागपूर कसोटीत खेळलेल्या संघातील दोन खेळाडूंच्या जागी दुसऱ्या दोघांना संधी देण्यात आल्याचे सांगितले.

केएल राहुलच्या जागी शिखर धवन तर उमेश यादवच्या जागी मोहम्मद शमी यांना संधी देण्यात आली. कसोटी कर्णधार म्हणून विराटचा हा ३२वा सामना आहे. परंतु कोणत्याही दोन सलग सामन्यात विराट आजपर्यंत कधीही सारखाच संघ घेऊन मैदानात उतरलेला नाही. त्याने ३२ कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या सामन्यात संघात एकतरी बदल केलेला आहे.

यापूर्वी हा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर होता. गांगुलीने कसोटी कर्णधार झाल्यानंतर सलग २८ कसोटीत सलग दोन सामन्यात कधीही सारखाच संघ मैदानात उतरवला नव्हता.