भारताची दमदार सुरुवात; विराटची शतकाकडे वाटचाल सुरु

केपटाऊन। भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याच्या रूपाने चौथा धक्का बसला आहे. त्याला ख्रिस मॉरिसने बाद केले आहे.

याआधी भारताने रोहित शर्माची सुरवातीलाच विकेट गमावली होती. त्याला आज १ धावही करता आलेली नाही. रोहितला कागिसो रबाडाने शून्य धावेवर बाद केले. रोहित या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात अयशस्वी ठरला आहे.

रोहित बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आणि सलामीवीर फलंदाज शिखर धवनने भारताचा डाव सांभाळला. या दोघांनीही अर्धशतके केली आहेत. मात्र शिखराला या अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्यात अपयश आले. त्याला जेपी ड्युमिनीने एडिन मार्करमकडे झेल देण्यास भाग पडले. शिखरने ६३ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. तसेच विराट आणि शिखरमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी झाली.

त्याच्या पाठोपाठ लगेचच अजिंक्य राहणेही ११ धावांवर बाद झाला. त्याचीही ड्युमिनीनेच विकेट घेतली. आज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला ५ व्या क्रमांकावर खेळण्यासाठी बढती मिळाली होती होती मात्र त्याला त्याचा उपयोग करता आला नाही. त्याने आज १४ धावा केल्या.

आज या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताने आत्तापर्यंत ३६ षटकात ४ बाद २०० धावा केल्या आहेत. सध्या विराट आणि एमएस धोनी नाबाद खेळात आहे.