तिसरी कसोटी: खराब वातावरणाच्या तक्रारींमुळे रंगलेल्या दुसऱ्या दिवशी विराटचे द्विशतक तर दिवसाखेर श्रीलंका ३ बाद १३१ धावा !

दिल्ली। भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर श्रीलंकेने पहिल्या डावात ३ बाद १३१ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी प्रदूषणामुळे येत असलेल्या व्यत्ययांनंतर भारताने ७ बाद ५३६ धावांवर डाव घोषित केला. या सामन्यात विराटने आपले सहावे द्विशतक पूर्ण केले.

श्रीलंकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर दिमुथ करुणारत्ने डावाच्या पहिल्याच षटकात पहिल्या चेंडूवर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक रिद्धिमान सहा करवी झेलबाद झाला. त्यानंतर लगेचच तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेला धनंजय डी सिल्वाला(१) इशांत शर्माने पायचीत बाद केले.

यानंतर दिलरुवान परेरा आणि अँजेलो मॅथ्यूजने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु परेरा ४२ धावांवर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. त्यानंतर मात्र मॅथ्यूज(५७*) आणि कर्णधार दिनेश चंडिमल(२५*) यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. या डावात क्षेत्ररक्षण करताना विराट कोहली आणि शिखर धवनकडून दोन झेल सुटले.

तत्पूर्वी, भारताने कालच्या ४ बाद ३७१ धावांवरून पुढे खेळताना सुरुवात चांगली केली. कर्णधार विराटने आपले द्विशतक साजरे करताना २८७ चेंडूत २४३ धावा केल्या तर रोहित शर्माने १०२ चेंडूत ६५ धावा केल्या. विराट आणि रोहित शर्माने १३५ धावांची शतकी भागीदारी केली. मात्र रोहित अर्धशतकी खेळी करून बाद झाला.

त्यानंतर दिवसाच्या दुसऱ्या सत्रात प्रदूषणामुळे श्रीलंकन खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले. यानंतर या खेळाडूंकडून खराब वातावरणाबद्दल तक्रारींचे नाट्य रंगले त्यामुळे अनेकदा सामन्यात व्यत्यय आला. त्यामुळे विराटने आपली विकेट गमावली. त्याआधी आर अश्विन ४ धावांवर बाद झाला.

अखेर प्रदूषणाच्या कारणाने सततच्या होणाऱ्या व्यत्ययांना आणि तक्रारींना त्रासलेल्या विराटने भारताचा डाव घोषित केला. जडेजा (५) आणि सहा (९) नाबाद राहिले.

श्रीलंकेकडून लाहिरू गामागे(९५/२), दिलरुवान परेरा(१४५/१) आणि लक्षण संदकान(१६७/४) यांनी बळी घेतले. या सामन्यात अजूनही भारत ४०५ धावांनी आघाडीवर आहे.

संक्षिप्त धावफलक:
भारत पहिला डाव: ७ बाद ५३६ धावा (घोषित)
श्रीलंका पहिला डाव: ३ बाद १३१ धावा
अँजेलो मॅथ्यूज(५७*) आणि दिनेश चंडिमल(२५*) खेळत आहेत.