भारताची मोठ्या विजयाकडे वाटचाल, ४१० धावांच्या आव्हानासमोर लंकेच्या ३ बाद ३१ धावा

दिल्ली। येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर भारताने दिलेल्या ४१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने ३ बाद ३१ धावा केल्या आहेत.

श्रीलंकेने त्यांच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब केली. सलामीवीर सदिरा समरविक्रमा ५ धावांवर असताना मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर अजिंक्य राहणे करवी झेलबाद झाला. त्यानंतर सलामीवीर दिमुथ करुणारत्ने आणि धनंजय डी सिल्वा यांनी डाव सावरण्याचा प्रयन्त केला परंतु करुणारत्ने (१३) देखील यष्टीरक्षक रिद्धिमान साहा करवी रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

त्याच्या पाठोपाठ लगेचच सुरंगा लकमलला (०) जडेजानेच त्रिफळाचित केले. त्यानंतर मात्र डी सिल्वा (१३*) आणि पहिल्या डावात शतक करणारा अँजेलो मॅथ्यूज (०) यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही.

तत्पूर्वी भारताने सकाळच्या सत्रात दीडशतकी खेळी करणाऱ्या श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमलला (१६४) बाद करत श्रीलंकेचा पहिला डाव ३७३ वर संपवला.

त्यानंतर भारताने दुसऱ्या डावाच्या सुरवातीला पहिल्या डावात शतकी खेळी करणारा सलामीवीर मुरली विजय(९) आणि या डावात तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अजिंक्य रहाणेचे (१०) बळी लवकर गमावले.

त्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव सांभाळत अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र पुजाराचे अर्धशतक १ धावेने हुकले तो ४९ धावांवर असताना मॅथ्यूज करवी डी सिल्वा च्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर भारताच्या फलंदाजांकडून चांगली फटकेबाजी बघायला मिळाली.

बर्थडे बॉय शिखरने ६७ धावांची अर्धशतकी खेळी करताना प्रथम श्रेणीतील ८००० धावांचा तसेच कसोटीतील २००० धावांचा टप्पाही पूर्ण केला. त्याचबरोबर भारताकडून कर्णधार विराट कोहलीनेही ५० धावा करत आपले कसोटीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्याबरोबरच रोहित शर्मानेही (५०*) नाबाद अर्धशतक पूर्ण केले. त्याने अर्धशतक पूर्ण करताच भारताने ५२.२ षटकांत ५ बाद २४६ धावांवर डाव घोषित केला.

श्रीलंकेकडून लाहिरू गामागे, दिलरुवान परेरा, धनंजय डी सिल्वा आणि लक्षण संदकान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला

संक्षिप्त धावफलक:
भारत पहिला डाव: ७ बाद ५३६ धावा (घोषित)
श्रीलंका पहिला डाव: सर्वबाद ३७३ धावा
भारत दुसरा डाव: ५ बाद २४६ धावा (घोषित)
श्रीलंका दुसरा डाव: ३ बाद ३१ धावा
धनंजय डी सिल्वा (१३*) आणि अँजेलो मॅथ्यूज (०*) खेळत आहेत.