तिसरी कसोटी: विराट अर्धशतक करून बाद

दिल्ली। येथे फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली दुसऱ्या डावात अर्धशतक करून बाद झाला.

विराटने या डावात ५८ चेंडूत ५० धावा केल्या आहेत. या अर्धशतकी खेळीत त्याने ३ चौकार मारले आहेत. विराटाचे हे या वर्षातील तिसरे कसोटी अर्धशतक आहे.

या बरोबरच विराटचा हा या वर्षातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्याला या कसोटी मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्धच सुरु होणाऱ्या वनडे आणि टी २० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तो आता थेट पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळेल.

विराटने या वर्षात अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २८१८ धावा केल्या आहेत. यात त्याने एकूण ११ शतके तर ३ द्विशतके केली आहेत.

भारताने या सामन्यात दुसरा डाव ५ बाद २४६ धावांवर घोषित केला आहे. भारताकडून या डावात शिखर धवन(६७), विराट कोहली(५०) आणि रोहित शर्माने (५०*) अर्धशतके केली आहेत. तर श्रीलंकेला ४१० धावांचे आव्हान दिले आहे.