आज होणार क्रिकेटच्या इतिहासात पहिलाच ४ दिवसीय कसोटी सामना

पोर्ट एलिझाबेथ । आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात पहिला ४ दिवसीय कसोटी सामना होणार आहे. १८७७साली पहिला कसोटी सामना झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ४ दिवसांच्या कसोटी सामन्याची सुरुवात होणार आहे.

ह्या सामन्यात ९८ षटके प्रत्येक दिवशी टाकावी लागणार असून १५० धावा या फॉललो-ऑनसाठी देण्यासाठी असणार आहेत. दिवसाचा खेळ हा ३०मिनिटापर्यंत वाढवता येऊ शकतो.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला नकार दिल्यामुळे दक्षिण आफ्रिका बोर्डाने आयसीसीच्या परवानगीने हा सामना आयोजित केला आहे. भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा ४ कसोटी, ५वनडे आणि ३ टी२० असा होता परंतु त्यात बदल करत तो ३ कसोटी, ६वनडे आणि ३ टी२० असा करण्यात आला.

या संघात दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलिअर्स पुनरागमन करत असून जानेवारी २०१६ नंतर प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे. डेल स्टेनही ऑक्टोबर २०१६नंतर प्रथमच कसोटी खेळणार आहे.