ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी -२० मालिकेत या ४ खेळाडूंकडे करण्यात आले दुर्लक्ष

-सचिन आमुणेकर

तीन सामन्यांची टी -२० मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारी चालू होणार आहे. पहिला सामना रांची येथे ७ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. संघाच्या निवडीमध्ये निवडकर्त्यांनी नवीन चेहर्यांना प्राधान्य दिले न देता तब्बल आठ महिन्यांनंतर ३८ वर्षीय आशिष नेहराला संघात स्थान देण्यात आले आहे. या मालिकेत अनेक दिग्गज खेळाडूंना बसवण्यात आले आहे. एकप्रकारे हा त्यांच्यासाठी मोठा संदेश असू शकतो.

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणेने मागच्या महिन्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध चांगली कामगिरी केली. त्याने या मालिकेत तब्बल चार अर्धशतक झळकावलीत.तीन सामन्यांमध्ये रोहित शर्मासोबत शतकीय भागीदारीही केली.

त्याने कोलकात्यात ५५ , इंदोरमध्ये ७०, बंगलोरमध्ये ५३ आणि नागपूरमध्ये ६१ धावा केल्या. संपूर्ण मालिकेत त्याने ४९ च्या सरासरीने २४४ धावा केल्या. एवढी चांगली कामगिरी करूनही अजिंक्य रहाणेची भारताच्या टी -२० संघामध्ये निवड झालली नाही. टी -२० मध्ये रहाणेने अनेक उत्तम खेळी केल्या आहेत. आयपीएलमध्येही त्याने भरपूर धावा केल्या आहेत

सुरेश रैना
सुरेश रैना सध्यातरी एकदिवसीय सामन्यात संघाच प्रतिनिधित्व करण्यास सक्षम नसला तरी,टी-२० मध्ये तो एक चांगला पर्याय ठरू शकतो. सोशल मीडियावरही लोकांनी रैनाची संघात निवड न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी टी -२० प्रकारात रैनाने अनेक उत्कृष्ट कामगिर्‍या केल्या आहेत.त्याने ६५ सामन्यांमध्ये १३०७ धावा केल्यात. त्याच्या टी -२० कारकिर्दीत १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.

ऋषभ पंत
२० वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतही संघात स्थान मिळविण्यासाठी धडपड करतोय. परंतु २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीचे स्थान संघात महत्वाचे मानले जातेय.धोनी अजूनही आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामना फिरवण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे ऋषभ पंतच संघातील स्थान निश्चित होण कठीण आहे. ऋषभ पंतला धोनीच्या जागेवर छोट्या स्वरूपात संधी दिली जाऊ शकते. युवा खेळाडूंना जर योग्य वेळी संधी उपलब्ध न झाल्यास त्याच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पंतने आतापर्यंत दोन टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

युवराज सिंग
षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा युवी क्रिकेटच्या या छोट्या स्वरूपात मोठी खेळी साकारू शकतो. कारण टी -20 मध्ये त्याला विशेष अनुभव आहे. युवराजने ५८ टी-२० सामन्यांत ११७७धावा केल्या आहेत. ८ अर्धशतकांची नोंद केली गेली आहे. त्यांची सर्वोच्च धावसंख्या ७७ आहे. या खेळाडूला पुन्हा एकदा संधी नाकारून एक मोठा संदेशच निवड समितीने दिला आहे.