महाराष्ट्राचे ४ खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकले

बेंगलोर । आज येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या वनडेत महाराष्ट्रातील ४ खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. यात नागपूच्या उमेश यादव, मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा व पुणेकर केदार जाधवचा समावेश आहे.

उमेश यादव
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३३४ अशी मोठी धावसंख्या उभारली. भारताकडून उमेश यादवने गोलंदाजी करताना १० षटकांत ७१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या एकूण ५ पैकी ४ विकेट्स एकट्या उमेशच्या नावावर होत्या. त्याने आज वनडे कारकिर्दीतील १०० विकेट्सचा टप्पाही पार केला.

अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा
सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी खणखणीत अर्धशतके झळकावली. अजिंक्य रहाणे ६६ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला तर रोहित ५५ चेंडूत ६५ धावा केल्या.

या सामन्यात या मुंबईकर जोडीने १८.२ षटकांत १०६ धावांची चांगली सलामी दिली. अजिंक्यचे हे वनडेतील २२ वे अर्धशतक असून त्याने मागील दहा वनडेत त्याने ७ अर्धशतके केली आहेत. तर या मालिकेतील हे सलग तिसरे अर्धशतक आहे. सलामीवीर म्हणून अशी कामगिरी केवळ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली आहे. रोहित शर्मानेही आज वनडेत ३४वे अर्धशतक झळकावले. यात त्याने १ चौकार आणि ५ षटकार खेचले.

केदार जाधव
केदार जाधवने संकटाच्या वेळी संघाच्या मदतीला येत अर्धशतक केले. त्याने ६९ चेंडूत ६७ धावा केल्या. त्यात ७ \चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. विशेष म्हणजे शतकवीर वॉर्नरला केदारानेच बाद केले.