कोलंबिया विरुद्धच्या सामन्यातील भारतासाठीच्या या ४ सकारात्मक बाबी

काल भारतीय अंडर १७ फुटबॉल संघाने खूप जिकरीचा खेळ केला परंतु पुन्हा विजयाने हुलकावणी दिल्याने भारताला कोलंबिया विरुद्धच्या सामन्यात २-१ असा पराभव स्वीकारावा लागला. हा सामना भारताने गमावला असला तरी अनेक कारणांनी हा सामना भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी खूप अविस्मरणीय ठरला आहे. या सामन्यात काही चांगल्या गोष्टी भारतीय फुटबॉलच्या चाहत्यांसाठी घडल्या त्या गोष्टींचा आपण विचार करू –

# १ विश्वचषकातील भारताचा पहिला गोल –
आजपर्यत फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात काल पहिल्यांदाच भारताकडून गोल नोंदवला गेला आहे. या सामन्यात जॅकसन सिंग याने भारतासाठी गोल केला आणि फिफाच्या स्पर्धेत गोल करणारा पहिला भारतीय होण्याचा मान त्याला मिळावला. पहिल्या सामन्यात जॅकसन सिंग याला स्थान देण्यात आले नव्हते परंतु दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात खूप बदल झाले आणि त्याला संघात स्थान मिळाले. या मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने गोल केला. या सामन्यात भारताने एकमेव गोल केला होता.

भारताचे पहिले गोल स्कोरर्स
ऑलंपिक गेम्स :१९४८,एस रमण, विरोधी संघ फ्रान्स
एशियन गेम्स :१९५१,एस मेवालाल, विरोधी संघ, इंडोनेशिया
एशियन कप :१९६४,अप्पलाराजू, विरोधी संघ कोरिया
फिफा विश्वचषक (अंडर १७): २०१७,जॅकसन सिंग,विरोधी संघ कोलंबिया

#२ संघ निवडीमध्ये मोठे बदल-
भारतीय प्रशिक्षक नॉर्मन मॅटोस यांनी संघाची निवड करताना सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मागील सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोमल थाटल याला संघात स्थान देण्यात आले नाही. थाटल याला न निवडणे हे भारताची नवीन रणनीती होती. त्यामुळे भारतीय प्रशिक्षकाला राहुल आणि निंथोइंगबा यांना दोन्ही विंगवर खेळवता येणार होते.

दुसरा महत्वाचा बदल म्हणजे अनिकेत जाधव याला वगळणे. अनिकेतने मागील सामन्यात प्रशिक्षकला आकर्षित करण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याच्या जागेवर रहीम याला खेळवण्यात आले.

#३ भारताचा ‘स्पायडर कीड’ –
२०११च्या एशियन कपमध्ये उत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय गोलकीपर सुब्रतो पॉल याला भारताचा ‘स्पायडर मॅन’ म्हणून संबोधले जाऊ लागले होते. त्याच प्रकारची प्रतिक्रिया सध्या भारतीय अंडर १७ संघाचा गोलकीपर धीरज मोइरांगथेम याच्या कामगिरीसाठी येत आहे आणि त्याला भारताचा ‘स्पायडर कीड’ म्हणून संबोधले जात आहे. भारताच्या गोलकीपरने मागील दोन सामन्यात उत्तम कामगिरी करत जगाला आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे.

धीरज हा त्याच्या गोल थोपवण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो असे नाही तर तो उत्तम प्रकारे खेळला समजून आपला खेळ बदलतो. याचा प्रत्यय कालच्या कोलंबिया विरुद्धच्या सामन्यात त्याने केला. कोलंबियन खेळाडू वेगाने भारतीय डिफेंडर्सला मागे टाकत होते त्यामुळे धीरज सामन्यात नेहमी पुढे येताना दिसत होता.

#४ अन्वर अलीची डिफेन्समधील उत्तम कामगिरी-
या विश्वचषकात ज्या काही मोजक्या खेळाडूंनी या स्पर्धेत आपली छाप टाकली आहे त्यात अन्वर अली याचे नाव सर्वात पुढे येते. मागील दोन्ही सामन्यात त्याने भारतीय डिफेन्सचे नेतृत्व करताना विरोधी संघाच्या खेळाडूंची अनेक चाली उध्वस्त केल्या आहेत. कालच्या सामन्यात देखील अन्वर अलीचे प्रदर्शन खूप जबरदस्त राहिले आहे. सामन्यात ७० टक्के बॉल पोजिशन ही कोलंबियन खेळाडूंकडे होती तरी देखील अन्वरने त्यांच्या अनेक चाली यशस्वी होऊ दिल्या नाहीत.