महाराष्ट्र राज्य इनडोअर रोईंग स्पर्धेत एमआयटी-एडीटी विद्यापीठाला 12 पदके

पुणे । महाराष्ट्र राज्य, आर्मी रोईंग नोड आणि कॉलेज ऑफ मिलेटरी इंजिनिअरिंग (सीएमई), पुणे यांच्यातर्फे आयोजित 46 व्या महाराष्ट्र राज्य इनडोअर रोईंग स्पर्धा 2019 मध्ये एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग लोणी काळभोरच्या स्पर्धकांनी रोईंगच्या विविध खेळ प्रकारात 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 6 कांस्य अशा एकूण 12 पदकांची कमाई केल्याची माहिती एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे क्रीडा संचालक पद्माकर फड यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य, आर्मी रोईंग नोड आणि कॉलेज ऑफ मिलेटरी इंजिनिअरिंग (सीएमई), पुणे यांच्यातर्फे आयोजित 46 व्या महाराष्ट्र राज्य इनडोअर रोईंग स्पर्धेत महाराष्ट्रातून आठ संघानी सहभाग घेतला होता. यात नाशिक, पुणे, सातारा, सांगली, भंडारा, आर्मी रोईंग नोड, बाईंज्‌ स्पोर्ट कंपनी (बीईजी) येथील एकूण अडीशे स्पर्धक सहभागी झाले होते. यात एमआयटी-एडीटी विद्यापीठातील 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

रोईंग सिंगल स्कल प्रकारात एमआयटी कॉलेज ऑफ फुट टेक्नॉलॉजीची प्रज्ञा राणे हिने तर रोईंग डबल स्कल प्रकारात एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनची भाग्यश्री कटकरे आणि फातिमा राजकोटवाला हिने सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच रोईंग सिंगल स्कल प्रकारात एमआयटी कॉलेज ऑफ फुट टेक्नॉलॉजीची अतुल्या देव, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचा तुषार देसाई, रोईंग सांघिक (फोर) प्रकारात एमआयटी कॉलेज ऑफ फुट टेक्नॉलॉजीची हर्षदा नारे, प्रज्ञा राणे, निकिता बुनियान, अंकिता मापारी यांनी रौप्य पदक जिंकले. रोईंग सिंगल स्कल प्रकारात महाराष्ट्र ॲकेडमी ऑफ नेव्हल एज्यूकेशन अन्ड ट्रेनिंग (मॅनेट) ची तेजस्वी कोलगे, पी राजेश, एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनची भाग्यश्री कटकरे, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचा तुषार देसाई यांनी तर रोईंग डबल स्कल प्रकारात मॅनेटचे ऋषिकेश तारापूरे, रोहित पाल, तेजस्वी कोलगे, स्नेहा कदम यांनी कांस्य पदक जिंकले. या सर्व स्पर्धांकांनी एमआयटी-एडीटी विद्यापीठातील रोईंगचे प्रशिक्षक सुहास कांबळे, संदीप भापकर आणि पंकज गायकवाड यांनी मार्गदर्शन केल्याची माहितीही क्रीडा संचालक पद्माकर फड यांनी दिली.