१० पैकी ५ फलंदाज झाले ० धावेवर बाद; संघाचा झाला २८२ धावांनी पराभव

0 364

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात आज इंग्लंड विरुद्ध कॅनडा यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने कॅनडाचा २८२ धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे या सामन्यात कॅनडाचे तब्बल ५ फलंदाज ० धावेवर बाद झाले.

इंग्लंडने कॅनडाला ३८४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कॅनडाच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. कॅनडाकडून सर्वाधिक धावा प्रणव शर्माने केल्या. त्याने २४ धावा केल्या. बाकी फलंदाजांनाही काही खास करता आले नाही.

कॅनडाचे रणधीर संधू, आकाश गिल, केविन सिंग, पीटर क्रिस्टियान प्रिटोरियस आणि रिशीव जोशी हे ५ फलंदाज ० धावेवर बाद झाले. त्यामुळे कॅनडाचा डाव ३१.५ षटकात १०१ धावांवरच संपुष्टात आला.

इंग्लंडकडून प्रेम सिसोदिया (३/२३), ऍडम फिंच(२/१०), रोमन वालकर (२/२५) आणि ल्यूक होलमन(२/२१) यांनी बळी घेतले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून लियाम बॅंक्स(१२०) आणि विल जॅक्स(१०२) यांनी शतकी खेळी केली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १८६ धावांची भागीदारी रचली. त्याच बरोबर जॅक डेव्हिसने ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. याच जोरावर इंग्लंडने ७ बाद ३८३ धावा केल्या.

कॅनडाकडून फैसल जमाखंडी(३/६८),पीटर क्रिस्टियान प्रिटोरियस(३/६९) आणि आकाश गिल(१/४८) यांनी बळी घेतले.

Comments
Loading...
%d bloggers like this: