जगातील ह्या ५ खेळाडूंच्या आहेत विचित्र क्रमांकाच्या जर्सी

क्रिकेट खेळात जरी फुटबॉल खेळा इतके जर्सीला महत्त्व नसले तरी बऱ्याचदा क्रिकेटपटूंच्या जर्सीची चर्चा होताना दिसते. नुकतेच सचिन तेंडुलकरच्या जर्सी क्रमांक १०ला भारतीय क्रिकेटमधून बीसीसीआयकडून निवृत्त करण्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे जर्सी क्रमांकाबद्दल मोठी चर्चा क्रिकेट वर्तुळातही सुरु झाली.

त्यामुळे महा स्पोर्ट्स टीमने क्रिकेटमधील असे काही खेळाडू शोधले ज्यांचे जर्सी क्रमांक हे विचित्र आहेत. ते असे-

१. हार्दिक पंड्या: जर्सी क्रमांक २२८
भारतीय संघातील हार्दिक पंड्या हा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी २० मालिकेत २६ जानेवारी २०१६ ला त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश दिला होता.

हार्दिकने १६ वर्षांखालील झालेल्या एका स्पर्धेत बडोदा संघाकडून खेळताना २२८ धावांची खेळी केली होती, जी त्याची क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे. म्हणून हार्दिक २२८ क्रमांकाची जर्सी घालतो.

२. मुथय्या मुरलीधरन: जर्सी क्रमांक ८००
श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी घेतले आहेत तसेच वनडेत ५३४ बळी घेतले आहेत. मुरलीधरनने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ८ क्रमांकाची जर्सी वापरली परंतु तो निवृत्त झाल्यावर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या ८०० बळींच्या विक्रमाच्या क्रमांकाची जर्सी आयपीएलमध्ये खेळताना घातली होती.

३ ख्रिस गेल: जर्सी क्रमांक ३३३
विंडीज संघाचा आक्रमक सलामीवीर असणारा ख्रिस गेलला आपण ३३३ क्रमांकाची जर्सी घातलेला पाहतो. ३३३ हा क्रमांक म्हणजे गेलची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे. या धावा त्याने श्रीलंकेविरुद्ध केल्या होत्या.

मात्र २०१३ आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बंगलोर संघातून खेळताना त्याने पुणे वॉरियर्स विरुद्ध १७५ धावांची खेळी केली होती, जी टी २० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे. त्यामुळे त्याने ३३३ क्रमांक बदलून १७५ क्रमांकाची जर्सी घातली होती.

४. चेतेश्वर पुजारा: जर्सी क्रमांक २६६
संयमी फलंदाजीसाठी ओळखला जाणारा भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना २६६ क्रमांकाची जर्सी घातली होती. पुजारा हा भारताचा २६६ वा भारतीय कसोटीपटू असल्याने त्याने या क्रमांकाची जर्सी घातली होती.

५. वीरेंद्र सेहवाग: जर्सीला क्रमांकच नाही
भारतीय संघातील धडाकेबाज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या जर्सीला क्रमांकाचं नव्हता. अंकशास्त्रावर विश्वास असतानाही त्याच्या जर्सीला क्रमांक नसल्याने सर्वांना त्याचे आश्चर्य वाटत होते.

सेहवाग पूर्वी ४४ क्रमांकाची जर्सी घालत होता. ज्याची बेरीज ४+४=८ अशी होते. जी त्याला एका अंकशास्त्र तज्ज्ञांनी त्याच्यासाठी चांगले नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याने हा क्रमांक बदलून क्रमांक नसलेलीच जर्सी घालायला सुरुवात केली.