क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?

मुंबईतील अनेक क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात मोलाचा वाटा उचलणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज (2 जानेवारी) मुंबईत त्यांच्या रहात्या घरी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 87 व्या वर्षी आज संध्याकाळी 6.30 वाजता शेवटचा श्वास घेतला.

आचरेकर यांचा जन्म 1932 मध्ये झाला होता. त्यांनी दादरमधील शिवाजी पार्कमध्ये अनेक क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले आहे. तसेच त्यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी अशा क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

या आहेत रमाकांत आचरेकरांबद्दल खास गोष्टी – 

– रमाकांत विठ्ठल आचरेकर असे त्यांचे पूर्ण नाव.

– त्यांनी दादरमधील शिवाजी पार्कमध्ये अनेक क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले आहे.

– रमाकांत आचरेकरांनी 1943 मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 1945 मध्ये न्यू हिंद स्पोर्ट क्बबकडून क्लब क्रिकेट खेळायला सुरु केले.

-त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकच प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला आहे. हा प्रथम श्रेणी सामना त्यांनी ऑल इंडिया स्टेट बँककडून हैद्राबाद विरुद्ध मोइन-उद-दोवला स्पर्धेत 1963-64 दरम्यान खेळला होता.

-त्यांनी त्यानंतर युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, रमेश पोवार, अजित आगरकर, प्रविण आम्रे असे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाकडून खेळलेले खेळाडू घडले आहेत.

– आचरेकर हे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीमुळे प्रकाशझोतात आले. ते सचिन लहान असताना त्याला त्यांच्या स्कुटीवर बसून मुंबईत अनेक मैदानांवर सरावासाठी घेऊन जात असत.

– सरावामुळे दमलेल्या सचिनसमोर ते एक रुपयाचे नाणे स्टंपवर ठेवत आणि जर त्या सत्रात कोणत्याही गोलंदाजाने सचिनला बाद केले तर ते नाणे त्या गोलंदाजाला मिळत असे. पण जर सचिन त्या सत्रात बाद झाला नाही तर ते नाणे सचिनला मिळत असे. सचिनने अशी एकूण 13 नाणी मिळवली आहेत. ही नाणी त्याच्यासाठी सर्वात मौल्यवात बक्षीस असल्याचे सचिन सांगतो.

–  सचिनने त्याच्या कारकिर्दीतील खेळलेला शेवटचा सामना पाहण्यासाठी आचरेकर हे वानखेडे मैदानावर उपस्थित होते. या सामन्यासाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण सचिनने स्वत: जाऊन त्यांना दिले होते.

 

– सचिन लहान असताना तो कनिष्ठ संघाकडून खेळायचा. त्यावेळी आचरेकर सरांनी त्याच्यासाठी एक सराव सामना ठेवला होता. त्यांनी त्या सराव सामन्यासाठी कर्णधाराशी बोलून सचिनला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आचरेकरांनी सांगितले होते.

पण त्याचवेळी त्यांचा वरिष्ठ संघ हॅरिस शेफिल्ड स्पर्धेचा अंतिम सामना खेळत असल्याने सचिन त्याच्या वरिष्ठ संघाला पाठिंबा देण्यासाठी थांबला आणि सराव सामन्याला गेलाच नाही, हे जेव्हा आचरेकर सरांना कळाले त्यावेळी त्यांनी सचिनला सर्वांसमोर चांगलेच सुनावले होते. ही घटना सचिनच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना होती. त्यामुळे त्याच्या आयुष्याला वेगळेवळण मिळाले असे सचिनने सांगितले होते.

– आचरेकरांना 1990 मध्ये त्यांच्या प्रशिक्षणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल द्रोणाचार्य हा पुरस्कार देण्यात आला होता. तसेच 2010 मध्ये त्यांना भारताचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. त्याचवर्षी गॅरी कर्स्टन यांच्या हस्ते त्यांचा जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकरांचे मुंबईत निधन

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया

टीम इंडियावर चिडले चाहते, असा केला राग व्यक्त