हे ५ तरुण खेळाडू २०१९मध्ये होऊ शकतात टीम इंडियाचे शिलेदार

भारतीय संघामध्ये गेल्या काही वर्षात अनेक बदल घडत आहेत. भारतीय संघात सध्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमणही पहायला मिळत आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून अनेक उदयोन्मुख खेळाडू सर्वांसमोर येत आहेत.

तसेच यावर्षी फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या 19 वर्षांखालील भारतीय संघातील खेळाडूंवरही निवड समितीचे लक्ष होते. पण त्यांच्यातील फक्त कर्णधार पृथ्वी शॉने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

मात्र पुढील वर्षी अनेक प्रतिभाशाली खेळाडूंना त्यांनी जर सातत्यपूर्ण कामगिरी केली तर आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

2019 मध्ये या भारतीय खेळाडूंना मिळू शकते आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी – 

आवेश खान – 22 वर्षीय वेगवान गोलंदाज गोलंदाज आवेश खानच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. तो चेंडूला चांगला बाउन्स देऊ शकतो. तसेच स्थिरावलेल्या फलंदाजाला अडचणीत आणू शकतो.

त्याची धावण्याचा ताल चांगला असून तो 140 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकू शकतो. त्याने 19 वर्षांखालील दोन विश्वचषकात भारताने प्रतिनिधित्व केले आहे. तो 2014 आणि 2016 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघात होता.

त्याने 2014 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्याने या स्पर्धेत 15.08 च्या सरासरीने 12 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर आवेश खानसाठी 2018 चे आयपीएल मोसमही चांगले गेले होते. तो या मोसमात दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळला होता.

शुभमन गिल – पृथ्वी शॉ नंतर ज्या खेळाडूने यावर्षी झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात प्रभावित केले तो शुभमन गिल वरिष्ठ भारतीय संघात पुढील वर्षी पदार्पण करण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. त्याने भारत अ संघातही त्याचे स्थान मिळवले आहे. तसेच त्याने भारत अ संघाकडून चांगली कामगिरी देखील केली आहे.

त्याचबरोबर तो सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतही चांगल्या लयीत खेळत असून त्याने पंजाब कडून खेळताना तमिळनाडू विरुद्ध 268 धावांची द्विशतकी खेळीही केली होती. तसेच त्यानंतर हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या डावात 148 धावांची शतकी खेळी केली आहे.

त्याचबरोबर त्याने यावर्षी 19 वर्षांखालील विश्वचषक भारताला जिंकून देण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. त्याची मधल्या फळीतील फलंदाजी भारताला फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे त्याचा पुढील वर्षी भारतीय संघातील समावेशाबाबत विचार होऊ शकतो.

नितिश राणा – मुंबई इंडियन्सकडून 2017च्या आयपीएलमध्ये खेळताना नितिश राणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने 13 सामन्यात 333 धावा केल्या होत्या. तसेच त्याने 2018मध्येही कोलकता नाइट रायडर्सकडून खेळताना 15 सामन्यात 304 धावा केल्या होत्या.

तसेच 2017-18 च्या रणजी ट्रॉफी मोसमातही त्याने चांगली कामगिरी केली होती. त्या मोसमात त्याने 55.73 च्या सरासरीने 12 सामन्यात 613 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर 2018-19 च्या रणजी मोसमात गौतम गंभीरने दिल्लीचे कर्णधारपद स्विकारण्यास नकार दिल्याने दिल्लीच्या नेतृत्वाची जबाबदारी नितिश राणावर सोपवण्यात आली आहे.

त्याची कामगिरी पाहता त्यालाही पुढीलवर्षी भारताच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.

शिवम मावी – पृथ्वी शॉ, शुभमन गिल प्रमाणे भारताच्या 19 वर्षांखालील विश्वचषक विजयात महत्त्वाची कामगिरी करणारा शिवम मावी हा देखील पुढीलवर्षी भारतीय संघात दिसू शकतो.

140 किमी प्रतितास वेगापेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्याने यावर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही पदार्पण केले आहे. तसेच त्याने भारत अ संघातही स्थान मिळवले आहे. त्याने यावर्षी 4 रणजी ट्रॉफीच्या सामन्यात खेळताना उत्तर प्रदेशकडून 15 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच त्याने यावर्षी पार पडेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात 9 विकेट्स घेतल्या होत्या. या स्पर्धेत त्याची गोलंदाजीचा इकोनॉमी रेट हा 4.12 असा होता.

देवदत्त पड्डीकल – 18 वर्षीय देवदत्त पड्डीकलला यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याच्या मुळ किमतीत 20 लाखात संघात सामील करुन घेतले आहे. त्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.

त्याने यावर्शी बांगलादेशमध्ये पार पडलेल्या 19 वर्षांखालील एशिया कप स्पर्धेत सर्वांना प्रभावित केले होते. त्याने संयुक्त अरब अमिराती विरुद्ध 121 धावांची खेळी केली होती. त्याने या स्पर्धेत 4 सामन्यात 45.75 च्या सरासरीने 183 धावा केल्या होत्या.

याबरोबरच त्याने यावर्षी कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने हे पदार्पण रणजी ट्रॉफी स्पर्धेतून महाराष्ट्राविरुद्ध केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने दुसऱ्या डावात 77 धावांची अर्धशतकी खेळी केली.

त्याने 4 प्रथम श्रेणी सामन्यात खेळताना 50.21 च्या सरासरीने 239 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

जर टीम इंडियाने कसोटी जिंकली तर आयसीसी क्रमवारीत होणार हे मोठे बदल

बापरे! कोहली तिसऱ्या कसोटीत १० दिग्गजांचे १० विक्रम मोडणार

जबरदस्त कामगिरी करणारा मुंबईकर खेळाडू टीम इंडियात का नाही?