२०१८मध्ये वनडेत धावांचा रतिब घालणारे ५ फलंदाज

यावर्षीतील सर्व संघाचे सामने संपले असल्याने आपल्याला वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाजही मिळाले आहेत. यात पहिल्या क्रमांकावर भारताचा कर्णधार विराट कोहली आहे.

2018 मध्ये वनडेत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दोन भारतीय, दोन इंग्लंड आणि झिम्बाब्वेच्या एका फलंदाजाचा समावेश आहे.

हे आहेत यावर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

1. विराट कोहली – विराटने यावर्षी 14 वनडे सामन्यात खेळताना 6 शतके आणि 3 अर्धशतकांसह 133.55 सरासरीने 1202 धावा केल्या आहेत. विराटने यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये नाबाद 160 धावांची खेळी केली होती.

ही खेळी विराटची यावर्षातील सर्वोत्तम खेळी ठरली. त्याने यावर्षी दोनवेळा 150 धावांचा टप्पा पार केला. त्याने विंडीज विरुद्ध विशाखापट्टनममध्ये नाबाद 157 धावांची खेळी केली.

2. रोहित शर्मा – भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने यावर्षीही वनडेमध्ये धावांचा रतीब घातला आहे. त्याने यावर्षी विराट पाठोपाठ वनडेत सर्वाधिक धावा केल्या आहेत.

त्याने यावर्षी 5 शतके आणि 3 अर्धशतकांसह 73.57 च्या सरासरीने 19 सामन्यात 1030 धावा केल्या आहेत. भारताने यावर्षी 20 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 19 सामन्यात रोहित खेळला आहे.

त्याने यावर्षी 2 वेळा 150 धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा त्याने दोन्हीवेळेस विंडीज विरुद्ध केला आहे. त्याने मुंबईमध्ये पार पडलेल्या सामन्यात 162 धावांची खेळी केली. तर गुवाहाटीमध्ये नाबाद 152 धावांची खेळी केली होती.

वनडेमध्ये जसे रोहितसाठी हे वर्ष खास ठरले आहे. तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही त्याच्यासाठी या वर्षाचा शेवट गोड झाला आहे. त्याला 30 डिसेंबरला कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

3. जॉनी बेअरस्टो – इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने या वर्षी 22 वनडे सामन्यात 46.59 च्या सरासरीने 1025 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 4 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध जूनमध्ये नॉटिंगघम येथे केलेली 139 धावांची खेळी ही त्याची यावर्षातील सर्वोत्कृष्ट खेळी ठरली आहे. तसेच त्याने न्यूझीलंड विरुद्ध मार्चमध्ये 138 धावांचीही खेळी केली होती.

4. जो रुट – इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज जो रुटनेही यावर्षी वनडेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्याला यावर्षी वनडेमध्ये 1000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी फक्त 54 धावा कमी पडल्या.

त्याने यावर्षी 24 वनडे सामन्यात खेळताना 3 शतके आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने 59.12 च्या सरासरीने 946 धावा केल्या आहेत. त्याने या तीन शतकांपैकी दोन शतके भारताविरुद्ध केली आहेत.

तसेच त्याने भारताविरुद्ध शेवटच्या वनडेत 100 धावा करत केलेल्या शतकी खेळी केल्यानंतर आणि सामना जिंकल्यानंतर बॅट ट्रॉप प्रकरण चांगलेच गाजले होते. त्याने भारताविरुद्ध लॉर्ड्सवर केलेली नाबाद 113 धावांची खेळी यावर्षातील त्याची वैयक्तिक सर्वोत्तम खेळी ठरली.

5. ब्रेंडन टेलर – झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज ब्रेंडन टेलर यावर्षी वनडेत सर्वाधिक धावा करण्यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने यावर्षी 2 शतके आणि 4 अर्धशतके करताना 42.76 च्या सरासरीने 898 धावा केल्या आहेत.

त्याने विश्वचषक पात्रता स्पर्धेत विंडिज विरुद्ध 138 धावांची शतकी खेळी केली होती. ही त्याची यावर्षीतील सर्वोत्तम खेळी ठरली. मात्र त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही झिम्बाब्वेला विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरता आले नाही.

त्याने त्याचे यावर्षातील पहिल्या शतक अफगाणिस्तान विरुद्ध शारजामध्ये केले होते. यात त्याने 125 धावांची खेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

२०१८ मध्ये कसोटी क्रिकेट गाजवणारे ५ गोलंदाज

२०१८ वर्षांत कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज

बुमराहला २०१९मध्ये सर्वच मालिकेत मिळणार नाही संधी, जाणून घ्या कारण

किंग कोहलीकडून यंग चाहत्याला क्रिकेट पॅड भेट, पहा व्हीडिओ