पाचवी कसोटी: टीम इंडियाच्या दुसऱ्या दिवसाखेर ६ बाद १७४ धावा

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाखेर 6 बाद 174 धावा केल्या आहेत.

भारताकडून दुसऱ्या दिवसाखेर अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी अनुक्रमे 8 आणि 25 धावांवर नाबाद खेळत आहे.

भारताची या डावाची सुरुवात खराब झाली होती. भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज शिखर धवनने 3 धावांवर असताना डावाच्या दुसऱ्याच षटकात विकेट गमावली आहे. त्याला दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने पायचीत बाद केले.

त्यानंतर केएल राहुल आणि चेतेश्वर पुजाराने डाव सांभाळला होता. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली होती. परंतू ही जोडी फोडण्यात सॅम करनला यश आले त्याने 37 धावांवर खेळणाऱ्या राहुलला त्रिफळाचीत केले.

त्यानंतर काही वेळातच पुजाराही 37 धावांवरच बाद झाला. त्याच्या पाठोपाठ अजिंक्य रहाणेनेही विकेट गमावली. या दोघांनाही अँडरसनने बाद केले. रहाणेला तर भोपळाही फोडता आला नाही.

पण तरीही एक बाजू भारताचा कर्णधार विराट कोहलीने सावरली होती. त्याला रहाणे बाद झाल्यानंतर पदार्पण करणाऱ्या विहारीने चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली.

पण विराटला नंतर बेन स्टोक्सने जो रुटकडे झेल देण्यास भाग पाडले आणि ही जोडी तोडली. विराटने या डावात 6 चौकारांसह 70 चेंडूत 49 धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर लगेचच रिषभ पंतही 5 धावांवर बाद झाला.

दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि बेन स्टोक्सने अनुक्रमे 20 आणि 44 धावा देत प्रत्येकी 2 विकेट्स, तर सॅम करन आणि स्टुअर्ट ब्रॉडने अनुक्रमे 46 आणि 25 धावा देत प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 332 धावा केल्या आहेत. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी(8 सप्टेंबर) 7 बाद 198 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती.

यावेळी जॉस बटलर आणि आदिल रशीद नाबाद खेळत होते. या दोघांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर रशीद 15 धावा करुन बाद झाला.

यानंतर बटलरने ब्रॉडला साथीला घेत 9 व्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी करत इंग्लंडला 300 धावांचा टप्पा पार करुन दिला. तसेच बटलरने अर्धशतकही केले. ही जोडी तोडण्यात नंतर फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाला यश आले. त्याने ब्रॉडला 38 धावांवर असताना केएल राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले.

यानंतर अखेर बटलरलाही बाद करण्यात जडेजाला यश मिळाले आणि इंग्लंडचा पहिला डाव 332 धावांवर संपुष्टात आला. त्याने बटलरचा हा झेल अजिंक्य रहाणेने घेतला. बटलरने या डावात 133 चेंडूत 89 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले.

त्याआधी पहिल्या दिवशी इंग्लंडकडून अॅलिस्टर कूक(71) आणि मोईन अलीने(50) अर्धशतके केली होती. तर जो रुट, जॉनी बेअरस्टो आणि सॅम करनला भोपळाही फोडता आला नव्हता. तसेच केटन जेनिंग्ज(23) आणि बेन स्टोक्सने(11) थोड्याफार धावा केल्या.

भारताकडून या डावात रविंद्र जडेजाने 79 धावात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्माने अनुक्रमे 83 आणि 62 धावा देत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा केएल राहुल एकमेव क्षेत्ररक्षक

Video: अक्षर पटेलला विकेट घेण्यात चक्क हेल्मेटने केली मदत!