यष्टीरक्षक रिषभ पंतने केली एमएस धोनीच्या या खास विक्रमाची बरोबरी

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिली कसोटी अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव आज तिसऱ्या दिवशी(8 डिसेंबर) 235 धावांवर संपुष्टात आला आहे.

या डावात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने यष्टीमागे 6 झेल घेतले आहे. याबरोबरच त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या कसोटी सामन्यातील एका डावात यष्टीरक्षक म्हणून 6 झेल घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

त्यामुळे आता कसोटी सामन्यात एका डावात भारतीय यष्टीरक्षकाने सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम संयुक्तरित्या धोनी आणि रिषभ पंत यांच्या नावावर झाला आहे.

धोनीने 2009 ला वेलिंग्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 6 झेल घेण्याचा पराक्रम केला होता.

त्याचबरोबर भारताकडून यष्टीमागे कसोटी सामन्यात एका डावात सर्वाधिक 6 विकेट घेण्याच्या विक्रमाशीही पंतने बरोबरी केली आहे. हा विक्रम याआधी सईद किरमानी, धोनी आणि वृद्धिमान साहा या तिघांच्या नावावर होता.

त्यापैकी किरमानी यांनी 1976 ला न्यूझीलंड विरुद्ध 5 झेल आणि 1 यष्टीचीत केले होते. तर सहाने विंडीज विरुद्ध 2016 ला 5 झेल आणि 1 यष्टीचीत करत यष्टीमागे 6 विकेट घेण्याची कामगिरी केली होती.

तसेच पंत हा आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यात एका डावात 6 झेल घेणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. त्याने पर्थमध्ये 2008 ला 5 झेल घेतले होते.

पंतने या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या पिटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, टीम पेन, उस्मान ख्वाजा, मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांचे झेल घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: जेव्हा कर्णधार कोहली मैदानातच दाखवतो नृत्यकला…

Video: मैदानावर सोडा विलियमसनने पाकिस्तानला मैदानाबाहेरही धूतले

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव २३५ धावांवरच संपुष्टात, भारताकडे १५ धावांची आघाडी