६४ वी राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धा- महाराष्ट्राच्या तनिष्क, कृष्णाची सुवर्णपदकाची कमाई

पुणे । महाराष्ट्राच्या तनिष्क भांड, कृष्णा हराळ यांनी भारतीय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि सायकलिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६४व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत आपापल्या गटात सुवर्णपदकाची कमाई केली.

रोड सायकलिंगचे प्रकार हिंजवडी फेज-२ आणि फेज-३ भागात विप्रो कंपनी गेट ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस दरम्यान एकेरी मार्गावर झाले. स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलींच्या १२ किलोमीटर मास स्टार्टमध्ये पुण्याच्या तनिष्क भांडने २१ मिनिटे ५१.०१ सेकंद वेळ नोंदवून महाराष्ट्राच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले. तनिष्क ही निगडीतील सिटी प्राईड स्कूलमद्ये इयत्ता ८ वीमध्ये शिकत आहे. मागील ४ महिन्यांपासून ती सायकलिंगचा सराव करीत असून यापूर्वी स्केटिंगमध्ये तिने राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके पटकावली आहेत. तर, पुण्याची मेहर पटेलने २२ मिनिटे १२.१८ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक आणि तमिळनाडूच्या श्रीमती जे.ने (२३ मि. ००.४२ से.) ब्राँझपदक पटकावले.

मेहर ही महाराष्ट्राच्या संघातील सर्वात लहान वयाची खेळाडू असून ती निगडीतील सेंट ऊर्सूला या शाळेत इयत्ता ६ वीमध्ये शिकत आहे. मागील चार महिन्यांपासून मेहर सराव करीत असून दररोज दोन तास ती तळेगाव, कामशेत परिसरात रोडवर सायकलिंग करते.

स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांच्या २४ किलोमीटर टाइम ट्रायल्स प्रकारात अहमदनगरच्या कृष्णा हराळने ३४ मिनिटे २१.४२ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. कृष्णा हा अहमदनगरपासून ३० किमीवर असलेल्या राळेगण म्हसोबा या गावातील आहे. यापूर्वी त्याने तीन शालेय राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पदके जिंकली आहेत. केरळच्या आदर्श व्ही. आर. याने ३५ मिनिटे १८.०५ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या सौरभ काजळेला (३५ मि. २७.२४४ से.) ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

यानंतर १७ वर्षांखालील मुलांच्या १८ किलोमीटर टाइम ट्रायल्स प्रकारात हरियाणाच्या जितेंद्र्र अहलावतने महाराष्ट्राच्या जन्मेजय मुगलला मागे टाकले. जितेंद्रने २६ मिनिटे ४४.७०६ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदकाची कमाई केली. नाशिकच्या जन्मेजयने २७ मिनिटे ०१.२०३ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक मिळवले. तमिळनाडूच्या मिचेल जॉन्सनने २७ मिनिटे ०७.९२३ सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदक पटकावले.

स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या १२ किलोमीटर टाइम ट्रायल्स प्रकारात केरळच्या धनम्मा चिचाकांडीने १८ मिनिटे ५८.१५० सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदकाची कमाई केली. गुजरातच्या स्रिया मिस्त्रीने २० मिनिटे ०३.०६५ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या प्रतीक्षा चौगुलेने (२० मि. ०५.२९७ से.) ब्राँझपदक मिळवले. यानंतर १४ वर्षांखालील मुलांच्या १२ किलोमीटर मास स्टार्टमध्ये झारखंडच्या नारायण महतोने बाजी मारली. त्याने २१ मिनिटे १९.४१० सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. महाराष्ट्राच्या विराज पाटीलने २१ मिनिटे २०.२१० सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक पटकावले. तेलंगणच्या चिरायुश पटवर्धनने २१ मिनिटे २१.५४९ सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदकाची कमाई केली.

म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात शुटिंग हॉलमध्ये स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. यावेळी एसजीएफआयचे कन्हैया गुर्जर, संजय साठे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, दिपाली पाटील, प्रताप जाधव, दिपाली शिळदणकर आदी उपस्थित होते.

निकाल – १९ वर्षांखालील मुले – २४ किमी टाइम ट्रायल – कृष्णा हराळ (महाराष्ट्र, ३४ मि. २१.४२ से.), आदर्श व्ही. आर. (केरळ, ३५ मि. १८.०५ से.), सौरभ काजळे (महाराष्ट्र, ३५ मि. २७.२४४ से.).

१७ वर्षांखालील मुले – १८ किमी टाइम ट्रायल्स – जितेंद्र अहलावत (हरियाणा) – २६ मि. ४४.७०६ से., जन्मेजय मुगल (महाराष्ट्र) – २७ मि. ०१.२०३ से., मिचेल जॉन्सन (तमिळनाडू) – २७ मि. ०७.९२३ से.

१९ वर्षांखालील मुली – १२ किमी टाइम ट्रायल्स – धनम्मा चिचकांडी (केरळ) – १८ मि. ५८.१५० से., स्रिया मिस्त्री (गुजरात) – २० मि. ०३.०६५ से., प्रतीक्षा चौगुले (महाराष्ट्र) – २० मि. ०५.२९७ से.

१४ वर्षांखालील मुली – १२ किमी मास स्टार्ट – तनिष्क भांड (महाराष्ट्र) – २१ मि. ५१.०१ से., महेर पटेल (महाराष्ट्र) – २२ मि. १२.१८ से., श्रीमती जे. (तमिळनाडू) – २३ मि. ००.४२ से.

१४ वर्षांखालील मुले – १२ किमी मास स्टार्ट – नारायण महतो (झारखंड) – २१ मि. १९.४१० से., विराज पाटील (महाराष्ट्र) – २१ मि. २०.२१० से., चिरायुश पटवर्धन (तेलंगणा) – २१ मि. २१.५४९ से.