६४ व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या सॅनुरी लोपेझ, अंजली रानवडेला सुवर्णपदक

पुणे: महाराष्ट्राच्या सॅनुरी लोपेझ, अंजली रानवडे यांनी भारतीय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि सायकलिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६४ व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
ट्रॅक सायकलिंगचे प्रकार म्हाळुंगे-बालेवाडी येथील वेलोड्रम स्टेडियममध्ये सुरू आहेत. या स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील २ किलोमीटर वैयक्तिक परसूट प्रकारात सॅनुरी लोपेझने ३ मिनिटे २३.५०९ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णयश मिळवले. झारखंडच्या तारा मिंझने ३ मिनिटे ३५.०९४ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक पटकावले. यानंतर महाराष्ट्राच्या झैना पिरखानने (३ मि. ३५.८२८) दिल्लीच्या शारदाला मागे टाकून ब्राँझपदक पटकावले. मुंबईची सॅनुरी आठवीत शिकत असून, राष्ट्रीय शालेय स्पर्धेच्या तयारीसाठी दररोज सकाळी ५ ते ६ यावेळेत ती सराव करते.
यानंतर स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या २ किलोमीटर वैयक्तिक परसूटमध्ये अंजलीने ३ मिनिटे ०४.८५७ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णयश मिळवले. दिल्लीच्या नाओरम चानूने (३ मि. ११.०९१ से.) रौप्यपदक मिळवले. ब्राँझपदकाच्या लढतीत पंजाबच्या अनुरीत गोरयाने (३ मि. ०७.३७६ से.) महाराष्ट्राच्या अदिती डोंगेरेवर (३ मि. १४.००४ से.) मात केली. पिंपरी-चिंचवडची अंजली अकरावीत प्रतीभा ज्युनियर कॉलेजमध्ये शिकते. दर्शन बारगुजे सरांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते. गेल्या वर्षी हरियाणात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रोड प्रकारात तिने पदक मिळवले होते.
स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांच्या ४ किमी वैयक्तिक परसूटमध्ये पंजाबच्या विश्वजित सिंग महाराष्ट्राच्या ओंकार आंग्रेला मागे टाकत सुवर्णपदक मिळवले. त्यामुळे ओंकारला  रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दिल्लीच्या टी. नामग्यालने (५ मि. ३१.९७७) ब्राँझपदक पटकावले. स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या २ किलोमीटर वैयक्तिक परसूटमध्ये महाराष्ट्राच्या रोहित पाटोळेने (२ मि. ४१.८४८ से.) ब्राँझपदक मिळवले.
 निकाल – १४ वर्षांखालील मुले – अर्णव श्री (झारखंड) – २ मि. ४९.९८६ से., नारायण महतो (झारखंड) – २ मि. ४८.५० से., चिरायुश पटवर्धन (तेलंगण) – २ मि. ५८.६३६ से. १४ वर्षांखालील मुली – २ किमी वैयक्तिक परसूट – सॅनुरी लोपेझ (महाराष्ट्र) – ३ मि. २३.५०९ से., तारा मिंझ (झारखंड) – ३ मि. ३५.०९४ से., झैना पीरखान (महाराष्ट्र) – ३ मि. ३५.८२८ से.
१७ वर्षांखालील मुले – २ किमी वैयक्तिक परसूट – के. बिशनसिंग (मणिपूर) – २ मि. ४१.८१३ से., अर्षद फिरीदी (दिल्ली) – २ मि. ४६.१७ से., रोहित पाटोळे (महाराष्ट्र) – २ मि. ४१. ८४८ से. १७ वर्षांखालील मुली – २ किमी वैयक्तिक परसूट – अंजली रानवडे (महाराष्ट्र) – ३ मि. ०४.८५७ से., नाओरम चानू (दिल्ली) – ३ मि. ११.०९१ से., अनुरीत गोरया (पंजाब) – ३ मि. ०७.३७६ से.
१९ वर्षांखालील मुले – ४ किमी वैयक्तिक परसूट – विश्वजित सिंग (पंजाब) – ओंकार आंग्रे (महाराष्ट्र) – टी. नामग्याल (दिल्ली). १९ वर्षांखालील मुली – ३ किमी वैयक्तिक परसूट – सहाना कुदिगनूर (कर्नाटक), अनिश सहारन (पंजाब), जुही कंथारिया (गुजरात).