६६वी महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र महिला साखळीतच गारद!

बिहार कबड्डी असो.च्या विद्यमाने पाटली पुत्र क्रीडा संकुल, पटणा येथे सुरू असलेल्या “६६व्या महिला राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेत महाराष्ट्राचा महिला संघावर साखळीतच गारद होण्याची वेळ आली. कबड्डीच्या इतिहासात महाराष्ट्र संघाचे साखळी फेरीतच आव्हान संपण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राला फ गटात केरळ संघाकडून १५-२३ असा ८ गुणांनी पराभव पत्करावा लागला.साखळी सामन्यात दोन विजय मिळवून देखील महाराष्ट्रावर ही नामुष्की ओढविली.

या गटात महाराष्ट्र, राजस्थान आणि केरळ यांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकल्यामुळे ४-४ समान साखळी गुण झाले. त्यामुळे या गटात कोणते दोन संघ बाद फेरीत दाखल होणार हे ठरविण्यासाठी गुण सरासरी काढण्यात आली. त्यात केरळ संघाचे अधिक ४ गुण, राजस्थान संघाचे ० गुण, तर महाराष्ट्राचे वजा ४ गुण झाले. त्यामुळे या गटातून केरळ गटविजेते, तर राजस्थान उपविजेते म्हणून बाद फेरीत दाखल झाले आणि महाराष्ट्र साखळीतच गारद झाले.

महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला १९५५ पासून कलकत्ता येथे सुरुवात झाली.१९५५ ते १९६० या काळात महाराष्ट्राचा संघ मुंबई इलाखा म्हणून या राष्ट्रीय स्पर्धेत विजेता होता. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर १९६१ ते १९७५ असे सलग विजेतेपद राखले.

१९७६साली गोवा-मडगाव येथे झालेल्या स्पर्धेत मोनोका नाथच्या बंगालने महाराष्ट्राच्या साम्राज्याला पहिला हादरा देत विजेतेपद मिळविले. पुन्हा १९७६ ते १९८२ पर्यंत महाराष्ट्राने विजेतेपद आपल्याकडे राखले. १९८२ ला मिळविलेले विजेतेपद हे महाराष्ट्राचे शेवटचे जेतेपद.

त्यानंतर १९८३ ला बंगालने पुन्हा एकदा महाराष्ट्राला पराभूत करीत विजेतेपद मिळविले. १९८४ पासून मात्र रेल्वेने विजेतेपदाचा धडाका लावला. रेल्वेचा हा धडाका २०१८ ला हिमाचल प्रदेशने रोखला. या कालावधीत महाराष्ट्र संघाने पहिल्या चार संघात तरी स्थान मिळविले होते, पण गतवर्षी महाराष्ट्र संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाले. तर यंदा तर साखळीतच गारद होण्याची वेळ महाराष्ट्र संघावर आली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

महाराष्ट्रातील कबड्डी प्रेमींसाठी आनंदाची बातमी.

प्रो कबड्डीच्या इतिहास पहिल्यादाच ऑल स्टार मध्ये होणार सामना

बारामती स्पोर्ट्स अकॅडमीच्या चार खेळाडूंची पुणे कबड्डी लीग साठी निवड.