आॅस्ट्रेलियन भूमीत किंग कोहलीने केला सचिन तेंडुलकर एवढाच मोठा कारनामा

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु असून या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 बाद 132 धावा केल्या आहेत. तसेच ते 175 धावांनी आघाडीवर आहेत.

या सामन्यात भारताचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे आॅस्ट्रेलियाने 43 धावांची आघाडी घेतली होती.

भारताकडून या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावात 257 चेंडूत 123 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. हे विराटचे आॅस्ट्रेलियन भूमीतील आॅस्ट्रेलिया विरुद्धचे एकूण 6 वे कसोटी शतक ठरले आहे. याबरोबरच त्याने एका खासविक्रमालाही गवसणी घातली आहे.

त्याने आॅस्ट्रेलिया विरुद्ध आॅस्ट्रेलियामध्ये 6 शतके करण्याच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तसेच आॅस्ट्रेलियन भूमीत आॅस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करण्याच्या यादीतही त्याने तेंडुलकरसह संयुक्तरित्या तिसरे स्थान मिळवले आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर इंग्लंडचे सर जॅक होब्स आहेत. त्यांनी आॅस्ट्रेलियाविरुद्ध आॅस्ट्रेलियामध्ये 9 शतके केली आहेत. तसेच दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचेच वॅली हॅमंड असून त्यांनी 7 शतके आॅस्ट्रेलियन भूमीत केली आहेत.

त्यानंतर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर 6 शतकांसह सचिन तेंडुलकर, हबर्ट सटक्लिफ आणि विराट कोहली आहेत.

विराटने आत्तापर्यंत आॅस्ट्रेलिया विरुद्ध 10 कसोटी सामने खेळताना 19 डावात ही 6 शतके केली आहेत. यातील 2012-13 च्या दौऱ्यातील एक, 2014-15 च्या दौऱ्यातील 4 शतकांचा आणि आज केलेल्या शतकांचा समावेश आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये आॅस्ट्रेलियन भूमीत आॅस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक शतके करणारे फलंदाज-

9 – सर जॅक होब्स (45 डाव) (इंग्लंड)

7 – वॅली हॅमंड (35 डाव) (इंग्लंड)

6 – विराट कोहली (19 डाव) (भारत)*

6 – सचिन तेंडुलकर (38 डाव) (भारत)

6 – हबर्ट सटक्लिफ (25 डाव) (इंग्लंड)

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..

मोठी बातमी – आॅस्ट्रेलियाला मोठा धक्का, सलामीवीर फलंदाज अॅरॉन फिंचला दुखापतीमुळे सोडावे लागले मैदान

विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर पेक्षा १३ डाव कमी खेळताना केला मोठा विश्वविक्रम

तब्बल २६ वर्षांनंतर पर्थमध्ये अशी कामगिरी करणारा विराट कोहली बनला केवळ चौथा भारतीय

दक्षिण आफ्रिका, इंग्लंड नंतर ऑस्ट्रेलियातही विराट कोहलीचा शतकाचा धडाका सुरूच