गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार, २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ७ वर्षापूर्वी, २ एप्रिल २०११ ला  विश्वचषक जिंकला होता. जिंकण्यासाठी धोनीने लगावलेला षटकार १२५ करोड भारतवासीयांच्या मनात आजही ताजेतवाना आहे.

भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर षटकार खेचत तब्बल २८ वर्षांच्या दिर्घ प्रतीक्षेनंतर भारताला विश्वचषक मिळवून दिला. या आधी २५ जून १९८३ ला भारताने कपील देवच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला होता. 

अंतिम फेरीत भारतासमोर होते २७५ धावांचे आव्हान 

भारत आणि श्रीलंका यांच्यात २०११ च्या विश्वचषकाची अंतिम फेरी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळली गेली होती. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ५० षटकात ६ गड्यांच्या बदल्यात २७४ धावा केल्या होत्या.

श्रीलंकेच्या जयवर्धनेने १०३ धावांची शानदार खेळी केली होती, तर कुमार संगकाराने ४८ धावा फटकावल्या होत्या. भारताच्या झहीर खान व युवराज सिंग यांनी २-२ बळी घेतले. तर श्रीसंतनेही १ बळी टिपला होता.

गौतमची ‘गंभीर’ खेळी 

आव्हानाचा पाठलाग करताना  भारतीय संघाची सुरुवात काही विशेष झाली नाही. २७५ धावांचा पाठलाग  करताना वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर लवकर बाद झाले. पण नंतर आलेल्या गौतम गंभीरने ९७ धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहोचवले. पाचव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या धोनीने ९३ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. धोनीने १० चेंडू बाकी असताना भारताला विजयी करत सचिनचे स्वप्न पूर्ण केले होते.